सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी कारखान्यावर डॉ.विठ्ठलदास असावा यांचा गौरव

Cityline Media
0


संगमनेर, प्नतिनिधी तालुक्यातील चणेगाव येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलदास बालकिसन आसावा यांनी कृषी, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राज्यभरात आदर्श निर्माण केला आहे.अखिल भारत वर्षीय माहेश्वरी महासभा आयोजित जोधपुर येथील जागतिक अधिवेशनात समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विठ्ठलदास आसावा यांच्या कार्याची दखल घेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता कार्यक्रमात मा.महसूलमंत्री अध्यक्ष बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग घुले, राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे,शेतकी संघाचे अध्यक्ष संपतराव डोंगरे,संचालक इंद्रजित थोरात,दिलीप नागरे, जनरल व्यवस्थापक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.विठ्ठलदास आसावा यांनी स्वतःच्या शेतात जैविक व रासायनिक संतुलन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, स्वयंसंपादित प्रयोग आणि तंत्रज्ञान प्रसारामुळे त्यांचे कार्य शेतीविश्वात उल्लेखनीय ठरले आहे.
डॉ.आसावा यांनी महाराष्ट्र शासनाचा पहिला विदेश कृषी अभ्यास दौरा चीन येथे पुर्ण केला. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २००६ हा मानाचा सन्मान राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.२०११ मध्ये पुण्यातील बालेवाडी येथे शेतकरी गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
अलीकडेच अमेरिकन मेरीट कौन्सिल, न्यू जर्सी (युएसए) यांनी त्यांना कृषी आणि पर्यावरण विषयातील मानद डॉक्टरेट प्रदान केली. तसेच रेसिड्यू-फ्री अँड ऑर्गेनिक मिशन इंडिया फेडरेशन, नवी दिल्ली यांनी त्यांना असोसिएटेड मेंबरशिप दिली आहे.

आसावा यांनी ऊस बेणे प्रक्रिया, हुमणी नियंत्रण प्रकाश सापळा, सायकल कोळपे, वनस्पतीजन्य अर्क, वर्मी-कम्पोस्ट, जलसंधारण, खुला गोठा अशा अनेक स्व-विकसित तंत्रज्ञानाचा आपल्या शेतात यशस्वी अवलंब केला आहे. त्यांच्या “शेतात काडेपेटी न वापरण्याचा संकल्प” या पर्यावरणपूरक मोहिमेमुळे हजारो शेतकऱ्यांनी पाचट जाळण्याची प्रथा थांबवून सेंद्रिय कार्बन वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. या उपक्रमामुळे मातीची सुपीकता वाढून उत्पादनातही मोठी भर पडली आहे.

कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी शेती शाळा, शेतकरी मेळावे, यूट्यूब चैनल (कृषी पंढरी आसावा) आणि शेकडो लेख, मुलाखती यांच्या माध्यमातून सातत्याने कार्य करत लाखो शेतकऱ्यांना आदर्श ऊभा केला आहे.ग्रामीण विकास, सहकार, महिला सक्षमीकरण, सबलीकरण, शिक्षण, स्वच्छता अभियान, रक्तदान, वृक्षारोपण अशा अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांनी अग्रणी भूमिका पार पाडली.

माहेश्वरी समाजातही त्यांनी जिल्हा ते प्रदेश स्तरावर नेतृत्व करत अनेक शैक्षणिक व सामाजिक योजनांना चालना दिली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध संस्थांनी त्यांना गौरविले आहे.

श्री आसावा यांची आगामी दृष्टी विषमुक्त अन्न उत्पादन, जल साक्षरता, पर्यावरण संरक्षण, भूमी सुधारणा व ग्रामविकास ही आहे.यामुळे कृषी व ग्रामीण क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. सातत्यपूर्ण नवोन्मेष, सकारात्मक विचार आणि प्रयोगशीलता यामुळे विठ्ठलदास आसावा हे राज्यातील कृषी परिवर्तनाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!