नाशिक दिनकर गायकवाड पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात इसमांनी एका मजूर महिलेकडील दोन लाख रुपयांचे दागिने हातचलाखीने चोरून नेल्याची घटना नाशिकरोड येथे घडली.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की फिर्यादी हिराबाई भगवान शिंदे (रा.सामनगाव रोड,नाशिकरोड) ही महिला नाशिकरोड येथील मिश्री वाईन शॉपजवळून पायी जात होती. त्यावेळी एका अनोळखी इसमाने महिलेला एकटे पाहून आवाज दिला, "अहो, इकडे या. मी पोलीस आहे.
एवढे सोने अंगावर घालायचे नाही," असे बोलून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मणी, डोरले व ओम पान असलेल्या पोतीला ओढून पाहिले; मात्र ती तुटली नाही म्हणून आरोपीने "सोन्याची पोत गळ्यातून काढून माझ्याकडे द्या. ती मी पिशवीत टाकून तुम्हाला देतो,” असे बोलला. त्यानंतर महिलेने गळ्यातील पोत काढून त्याच्याकडे दिली. त्याने महिलेला बोलण्यात गुंतवून तिचा विश्वास संपादन करून महिलेचे २ लाख २५० रुपये किमतीचे दागिने पिशवीत टाकण्याचा बहाणा करून हातचलाखीने चोरी करून तोतया पोलीस पळून गेला.
