रोल बॉलच्या भविष्याचा आराखडा शिर्डी ठरला

Cityline Media
0
आरबीएफआयची वार्षिक सभा उत्साहात 

श्रीरामपूर  दिपक कदम रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडियाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शिर्डी येथे अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडली.या सभेच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तपन आचार्य होते.या महत्त्वपूर्ण सभेसाठी रोल बॉल खेळाचे जनक राजू दाभाडे हे विशेष उपस्थित होते.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे रोल बॉल हा खेळ भारतासह जगातील ५० पेक्षा अधिक देशांमध्ये पोहोचला असून, त्यांच्या उपस्थितीमुळे सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.यावेळी फेडरेशनचे सचिव श्री. प्रताप पगार, पी. के. भारतकुमार, रणवीर सिंग यांच्यासह देशातील २० राज्यांमधील राज्य रोल बॉल संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वार्षिक सभेबरोबरच रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडियाची विशेष बैठक देखील शिर्डी येथे पार पडली. या बैठकीस २० राज्य संघटनांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२६ मध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध वयोगटांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कर्नाटक रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष भारतकुमार यांनी द्वितीय कनिष्ठ रोल बॉल जागतिक अजिंक्यपद स्पर्धा बेंगळुरू येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला, ज्यास उपस्थित सदस्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

सभेत जागतिक रोल बॉल लीग, अस्मिता खेलो इंडिया लीग, तसेच आगामी काळात रोल बॉल खेळाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. यामध्ये रोल बॉलच्या सर्व राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा पेपरलेस पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात श्री. रोहन दाभाडे यांनी ऑनलाईन प्रणालीचे प्रात्यक्षिक सादर केले.भविष्यात सर्व क्लब, जिल्हा संघटना, राज्य संघटना तसेच खेळाडू, मार्गदर्शक, पंच व संघटना पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

क्रीडा मंत्रालय, भारत सरकारने जारी केलेल्या क्रीडा संहितेचे (स्पोर्ट्स कोड) पालन सर्व जिल्हा व राज्य संघटनांनी करावे, यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.रोल बॉल खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, खेळाडूंना शिष्यवृत्ती, क्रीडा साहित्य निधी, तसेच स्पोर्ट्स अकॉर्ड व एआयएम एस या संस्थांच्या मान्यतेसाठी आरबीएफआयचे अध्यक्ष तपन आचार्य यांनी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली.

लवकरच रोल बॉलची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लीग सुरू करण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी मनोज यादव व चेतन भांडवलकर विशेष लक्ष देत असल्याचे जाहीर करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा अहिल्यानगर जिल्हा रोल बॉल संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

संघटनेचे सचिव सोमनाथ घुगे, नितीन बलराज,गौरव डेंगळे व इतर पदाधिकाऱ्यांनी साईबाबांची पुरुष मूर्ती, शाल, फुले व प्रसाद देऊन सर्व पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. तसेच संपूर्ण सभेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सर्व तयारी अहिल्यानगर संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

बैठकीच्या शेवटी आरबीएफआयचे सचिव प्रताप पगार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.ही वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष बैठक रोल बॉल खेळाच्या भविष्यासाठी दिशा देणारी ठरली असून,देशभरातील रोल बॉल संघटनांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!