पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल,आरोपी फरार
नाशिक दिनकर गायकवाड जिल्ह्यातील इगतपुरी येथे दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार इगतपुरी शहरात घडला आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात त्रिंगलवाडी येथील तीन तरुणांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पीडित मुलगी दहावीत शिकत असून ती परीक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी शाळेत जात होती.
शहरातील पटेल चौक परिसरातून जात असताना दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी तिला रस्त्यात अडवले. तू खूप सुंदर दिसतेस असे म्हणत तरुणांनी तिची छेड काढली व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. इतकेच नव्हे तर, मला हो म्हण, नाहीतर तुला किडनॅप करेन,अशी धमकी देत तिला शिवीगाळही करण्यात आली.
मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी शिवा भले (रा. त्रिंगलवाडी), ज्ञानेश्वर आगविले (रा. त्रिंगलवाडी), एकनाथ गिरे (रा. त्रिंगलवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून पालकांशी संपर्क साधला. पालकांनी तातडीने इगतपुरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. इगतपुरी शहरात शाळा सुटण्याच्या वेळी टवाळखोर
मुलांचे टोळके मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गस्त वाढवावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.इगतपुरीत टवाळखोरीचे थैमान झाले असून पालकवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
