नाशिक दिनकर गायकवाड पार्किंगच्या वादातून एका
घरात तलवार हातात घेऊन घुसून कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तीन जणांपैकी एकाला अटक केली आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी सागर किशोर परदेशी (रा. डेव्हलपमेंट एरिया, आनंद रोड, देवळाली कॅम्प) याचा भाऊ सिद्धार्थ परदेशी व आरोपी केशरसिंग चुड्डा (वय ४५, रा. हुसेन रोड, रा. देवळाली कॅम्प), अमितोजसिंग चुड्डा व एक
अनोळखी इसम याच्यासोबत पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी केशरसिंग चुड्डा, अमितोजसिंग चुड्डा व अनोळखी इसम हातात तलवार घेऊन फिर्यादीच्या घरात बळजबरीने घुसले. फिर्यादीची आई संगीता परदेशी, भाऊ सिद्धार्थ परदेशी व घरातील सदस्यांना आरोर्पीनी तलवारीचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, केशरसिंग चुड्डा याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बोरसे करीत आहेत.
