मविप्रतर्फे शोकसभेत अजित पवारांना मानवंदना
नाशिक दिनकर गायकवाड अजित पवार म्हणजे लोकसंग्रह,समस्येचे योग्य आकलन व त्वरित समाधान आणि सर्वांसाठी उपलब्ध असे एक विलक्षण नेतृत्त्व होते, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांसारखे महाराष्ट्राच्या जनतेच्या खऱ्या अर्थान मनावर राज्य करणारा नेता आपल्यातून गेला, पुढील अनेक दशके असा अजातशत्रू आणि जनतेचा दादा असणारा नेता होऊ शकेल की नाही याची शाशंकता वाटते, असे मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हादरला.त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे काल दुपारी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांनी दिवंगत अजित पवारा विषयी आठवणींना उजाळा दिला आणि मनोगतातून आपल्या भावनांना वाट करून दिली.अस्सल मातीत उगवलेले डौलदार वटवृक्ष ज्याने सबंध महाराष्ट्राला आपली छत्रछाया दिली, असे नेतृत्व म्हणजे अजित पवार होते,असे मा. आमदार नानासाहेब बोरस्ते म्हणाले.
हे अंक सामान्य कार्यकर्त्याच्या निवेदनावर सुद्धा दादांच्या कार्यालयातून प्रतिक्रिया येत असत व काम पूर्ण होत,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.शरद पवारांसारख्या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली वाढून सुद्धा स्वतःची वेगळी दमदार ओळख केवळ अजित पवारांसारखेच अजातशत्रू व्यक्तिमत्त्व | घडवू शकते. असे महात्मा गांधी विद्या
मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष हरिष आडके यांनी सांगितले,
नवीन लोकप्रतिनिधीस आणि आमदारांना त्यांच्याकडून शिस्तीची शिकवण मिळाली आणि प्रत्येक विषयाकडे अभ्यासूवृत्तीने पाहण्याची समज मिळाली. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचे शाश्वत समाधान होते. आता समस्या घेऊन कोणाकडे जावे, अशी पोकळी निर्माण झाली असल्याचे माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे म्हणाले.
शासन दरबारी अजित पवारांनी नेहमी मविप्रच्या पालकत्त्वाच्या भूमिकेत आमच्या पाठीशी ठाम उभे राहिले. परंतु कोणताही प्रस्ताव हा मुद्देसूद, त्रुटीरहित व परिपूर्ण असावा, असा नेहमी त्यांचा आग्रह असायचा, असे मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले यांनी सांगितले.
मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले, दादा गेले या बातमीवर विश्वास ठेवायला अजूनही मन तयार होत नाही, विमान अपघाताची बातमी पहिल्यांदा ऐकल्यावर क्षणोक्षणी वाटायचे की अजित पवार सुखरूप आहेत,अशी वृत्त येईल परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते,त्यांच्या जाण्याने मविप्र समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. अजित पवारांचे जनतेसाठी सदैव
तत्पर असणे,कामातला वक्तशीरपणा आणि प्रत्येक समस्या, सहकार, अर्थ, क्रीडा यांसह सर्वच विषयांतील सखोल अभ्यास या त्यांच्या गुणांची उपस्थितांतर्फे उजळणी करण्यात आली. आ. प्रा. देवयानी फरांदे मा. मंत्रीआ. माणिकराव कोकाटे यांनी पाठविलेल्या शोक संदेशाचे वाचन करण्यात आले.
आ. सीमा हिरे यांच्या वतीने त्यांची कन्या रश्मी हिरे बेंडाळे यांनी अजित पवारांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय फडोळ, म्हाडा नाशिक विभाग अध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर,
मा.आ.जयवंत जाधव, माजी खासदार देविदास पिंगळे, मा. मंत्री विजय नवल पाटील, मविप्र म. सरचिटणीस निलिमा पवार, माणिक बोरस्ते, अरविंद कारे यांसह लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी, मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे,
उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, रमेश पिंगळे, ॲड. लक्ष्मण लांडगे, विजय पगार, ॲड. संदीप गुळवे, शिवाजी गडाख, कृष्णाजी भगत, नंदकुमार बनकर, शालन सोनवणे, शोभा बोरस्ते यांसह आजी, माजी पदाधिकारी, संचालक, शिक्षणाधिकारी, सेवक व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मविप्रतर्फे अजित पवारांच्या नावाने क्रीडा अकादमी सुरु करण्यात यावी,असा प्रस्ताव पुढे आला.
या कार्यक्रमाचे संयोजन शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. विलास देशमुख,प्रा. डॉ. दिलीप पवार यांनी केले. स्व. अजितदादांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहून शोकसभेची सांगता करण्यात आली.
