आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आश्वी बुद्रुक.व आश्वी खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील ‘कोल्हापूर टाईप’ वसंत बंधाऱ्याला यंदा तब्बल ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी भक्कम पोलादी बॅरिगेट उभारणी केल्याने या जिर्ण पुलाचे रुपडेच बदलले आहे.
आश्वी बु.ते वसंत बंधारा डांबरी रस्ता पूर्ण, तसेच वसंत बंधारा ते आश्वी खुर्द बाजारतळ खडीकरणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच या मार्गाचे डांबरीकरणही पूर्ण होणार आहे.प्रवरा नदीवर उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक बंधाऱ्यामुळे परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली असून शेती,वाहतूक आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळाली आहे.अलीकडील सुशोभीकरण, सुरक्षा रेलिंग व रस्त्यांच्या कामांमुळे बंधाऱ्याचे रुपडे पूर्णतःपालटले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सहकार क्षेत्राचे जनक यांनी प्रवरानगर परिसरात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा वारसा पुढे बाळासाहेब विखे पाटील यांनी समर्थपणे चालवत शेतकरी व सहकार यांच्यातील नाळ अधिक दृढ केली. उस क्षेत्र वाढावे व बारमाही पाणीपुरवठा व्हावा या हेतूने प्रवरा नदीवर आश्वी ते बेलापूरपर्यंत साखळी पद्धतीने कोल्हापूर टाईप वसंत बंधारे कारखान्याच्या खर्चातून उभारण्यात आले.
सन १९९० मध्ये बंधाऱ्याचे भूमिपूजन होऊन दोन वर्षे रात्रंदिवस काम सुरू राहिले आणि १९९२ मध्ये बंधारा पूर्णत्वास गेला.उद्घाटन प्रसंगी तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील मा.आमदार आण्णासाहेब म्हस्के तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बंधाऱ्यामुळे परिसरातील सुमारे २० गावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ, उस क्षेत्राचा विस्तार आणि शेती उत्पादनात वाढ झाली.तसेच बंधाऱ्यावर तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे ३५ गावांतील नागरिकांचे परस्पर आदान-प्रदान सुलभ होऊन शिक्षण, व्यापार आणि सामाजिक विकासाला नवी गती मिळाली.
आज ३३ वर्षांनंतर सुशोभीकरण व दुरुस्तीमुळे हा बंधारा वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित,आकर्षक व उपयुक्त ठरला असून परिसराच्या विकासाचा जीवनदायी दुवा म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
-विकासाचा जीवनदायी दुवा
“सुमारे ३३ वर्षांपूर्वी पावसाळा व हिवाळ्यात नदीला पाणी असल्याने गावकऱ्यांना बोटीतून प्रवास करावा लागत असे. शेतकरीहिताची दूरदृष्टी व परिसरावरील प्रेम यामुळे पद्मभुषण खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला. आज हा बंधारा केवळ पाण्याचा स्रोत नसून परिसराच्या विकासाचा आधारस्तंभ ठरला आहे.”
अशोक शंकर भोसले, सेवानिवृत्त शिक्षक,आश्वी खुर्द
