झरेकाठी सोमनाथ डोळे एकेकाळी १०० रुपयांच्या बचतीने सुरुवात करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दच्या सौ.शोभना प्रकाश सोनवणे आज राज्याबाहेर व विदेशात सेंद्रिय लोणचे पुरवणाऱ्या “माई प्रसाद ऍग्रो फूड्स प्रा.लि.” या यशस्वी ब्रँडच्या संस्थापक आहेत!
सौ.सोनवणे यांच्या जीवन प्रवासात जिद्द,संघर्ष,वेदना आणि मातृत्वाचे सामर्थ्य आहे आणि म्हणूनच त्या महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी उद्यमशीलतेचा दीपस्तंभ ठरल्या आहेत!
आर्थिक शोषण थांबवण्यासाठी उभी राहिलेली ‘शक्ती’
सौ.शोभना यांनी महिलांचे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारे आर्थिक शोषण जवळून पाहिले.“महिलांनी कष्ट करावेत आणि इतरांच्या पायात बेड्या नको.म्हणून आम्ही उमेद अभियानाशी जोडून बचत गट सुरू केला,” असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला १०० रुपयांच्या बचतीमुळे कर्ज कमी मिळत होते. मात्र उमेद अभियानाच्या आरएफ,सीआय एफ आणि व्हीआरएफ निधीमुळे महिलांचे हात आर्थिकदृष्ट्या सबळ झाले.
‘कॅन्सर ट्रेन’ने दिले सेंद्रिय जीवनाचे भान
राळेगणसिद्धी येथे प्रशिक्षण दरम्यान कॅन्सरग्रस्त भागातील ‘कॅन्सर ट्रेन’ पाहिली आणि विषमुक्त जीवन किती महत्वाचे आहे याची जाणीव तीव्र झाली.
नातवासाठी बनवलेले सेंद्रिय लोणचे बाजारात जोरदार विकले जाऊ लागले. त्यातूनच “माई प्रसाद” ब्रँडचा जन्म झाला.नगरच्या साई ज्योती यात्रेत पहिल्याच दिवशी लोणच्याची ५,००० रुपये विक्री झाली आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
मुलाच्या मृत्यूचा अपघात आणि फिनिक्ससारखी भरारी!
दिवाळीच्या दिवशी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला.
तीन वर्ष त्या गहिवरलेल्या वेदनेत स्वतःला एका खोलीत बंद ठेवून जगल्या.
कुटुंब,दोन मुली,नातवंड आणि बचत गटातील महिलांच्या प्रेमाने त्यांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळाले.
“माझे दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा इतरांच्या अडचणी दूर करण्यासाठी काम करणे हीच माझ्या मुलाला खरी श्रद्धांजली,” असा त्यांचा आज ठाम विश्वास आहे.
‘ज्योती यात्रा’ ते देश-विदेशातील यश!
उमेद अभियानाने त्यांना भारतातील प्रमुख प्रदर्शनांत सहभागी होण्याची मोठी संधी दिली मुंबई बीकेसी सरस, महालक्ष्मी प्रदर्शन आणि नोएडा एक्झिबिशन.
येथूनच “माई प्रसाद” ब्रँडला बाजारपेठेचे मोठे दार उघडले.
त्यांच्या सेंद्रिय लोणच्याचा पुरवठा आता महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये तसेच परदेशातही केला जातो.
पुरस्कार आणि गौरव
शोभनाताईंच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला आहे.
त्यापैकी —
• हिरकणी सुगरण पुरस्कार
• अहिल्यादेवी पुरस्कार
• ‘घे भरारी’मध्ये निवड
उद्यम हिरकणी / सह्याद्री पुरस्कार
महिलांसाठी प्रेरणादायी संदेश
“सत्याने काम करा, कष्टाची साथ सोडू नका. महिलांच्या अंगी असलेली चिकाटी आणि कष्टांची ताकद त्यांना कधीच हार मानू देत नाही,” असा त्यांचा ठाम संदेश आहे.
त्यांचे पुढील ध्येय —
प्रत्येक महिलेला उद्योगाच्या उंबरठ्यापर्यंत नेणे आणि ‘बचत गट ते उद्योग’ हा प्रवास गावोगाव पोहोचवणे.
शोभना प्रकाश सोनवणे यांची जीवनकहाणी सिद्ध करते
