लोणी रुपाली भालेराव प्रवरा परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक निसर्गाचे चक्र फिरले आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.राहता तालुक्यातील लोणी आणि आजूबाजूच्या परिसरात सायंकाळी ६ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे वर्षभर कष्ट करून पिकवलेला घास डोळ्या देखत मातीमोल झाल्याने बळीराजासमोर आता उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.लोणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असतानाच सोमवारी अचानक वातावरणात बदल झाला.सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरींमुळे गव्हाच्या उभ्या पिकाला मोठा फटका बसला आहे.
काही ठिकाणी शेतकऱ्यांनी गहू कापून ठेवला होता, तर काही ठिकाणी पीक कापणीवर आले होते.मात्र,या अवकाळी पावसामुळे कापलेला आणि उभा असलेला दोन्ही प्रकारचा गहू पूर्णपणे भिजला असून तो आता मातीमोल झाला आहे. याशिवाय मका पिकाचेही मोठे नुकसान झाले असून जोरदार वाऱ्यामुळे मका जमीनदोस्त झाली आहे.
गहू आणि मक्यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरीही निराशाच आली आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे.कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी त्यावर मोठी मदार ठेवली होती, परंतु आता पाणी साचल्यामुळे हे पीक हातातून जाण्याची दाट शक्यता आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे गुंतवलेले भांडवलही निघणे कठीण झाले आहे,ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
आधीच विविध नैसर्गिक संकटे आणि बाजार भावातील चढ-उतार यामुळे त्रस्त असलेला बळीराजा या अस्मानी संकटामुळे पूर्णपणे कोलमडून गेला आहे.मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा,या चिंतेत आता संपूर्ण शेतकरी वर्ग पडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन लवकरच दिलासा मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. या अवकाळी पावसामुळे लोणी परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून सर्वत्र चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे
