धांदरफळ,डेरेवाडी,निमज गावातील नुकसानग्रस्त भागाची आमदार खताळांकडून पाहणी
संगमनेर प्रतिनिधी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने आणि गारपिटीने मोठे नुकसान झालेल्या भागाची आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच पाहणी करून महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक,धांदरफळ खुर्द, डेरेवाडी,गोडसेवाडी, निमज व राजापूर या गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.गहू,कांदा, टोमॅटो मका तसेच डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतांतील उभी पिके आडवी पडली आहेत.
गारपिटीमुळे डाळिंब बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.धांदरफळ बुद्रुक गावांतर्गत डेरेवाडी येथे संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेली. या घटनेत आदिती संजय साबळे ही जखमी झाली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साठेनगर येथील भास्कर आल्हाट यांच्या घरावरील पत्रे उडून गेली. त्याचवेळी घरात झोळीमध्ये झोपलेल्या लहान मुलीला तिच्या आईने प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर काढले. तसेच वर्षा भिमराज गोर्डे यांचे घर कोसळले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेचे,भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. निमज येथील कृषीभूषण पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ यांच्या डाळिंब बागेसह श्यामराव किसन कासार यांच्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
निमज येथील महानुभाव पंथाच्या आश्रमावरील पत्रे उडून गेली आहेत. आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्या साठी पंचनामे विलंब न करता पूर्ण करावेत,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी,तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके,निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम,ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक धांदरफळ खुर्द ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
“कर्तव्यदक्ष आमदारांची दखल; घरकुलासाठी तात्काळ आदेश”
धांदरफळ बुद्रुक येथील भास्कर आल्हाट यांनी घरकुल योजनेसाठी वारंवार अर्ज करूनही लाभ मिळाला नसल्याची तक्रार आमदार खताळ यांच्यासमोर मांडली. यावर आमदार खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक यांना जाब विचारत “आल्हाट यांचे नाव तात्काळ घरकुल योजनेच्या यादीत समाविष्ट करा,” असे सत्य निर्देश आमदार खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी मंडलिक यांना दिले.
