संगमनेर मध्ये जाजू इंग्लिश मीडियम स्कूलचे लोकार्पण
संगमनेर प्नतिनिधी शालेय अभ्यासक्रमाच्या बरोबरीने आता कौशल्य शिक्षणाची सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळा आता कौशल्य विकासाचे केंद्र झाले पाहीजे अशी अपेक्षा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथे व्यक्त केली.
संगमनेर येथे बाल शिक्षण मंडळाच्या जाजू इंग्लिश मिडीयम स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन रामभाऊ म्हाळूंगी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार अमोल खताळ, भाजपा नेते शाम जाजू, संस्थेचे अध्यक्ष ॲड.अरविंद गणपुले, सचिव सौ.निला जोशी, डॉ.अरविंद रसाळ, जाजू परिवाराचे प्रतिनिधी सुरेश जाजू, निलेश जाजू यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,अतिशय समर्पित भावनेने बाल शिक्षण मंडळाची वाटचाल १९५२ सालापासून सुरु आहे. समाजातील दानशुर व्यक्तिंनी संस्थेच्या या शैक्षणिक कार्याला पाठबळही दिले आहे. मात्र काळानूरुप आता शैक्षणिक संस्थानांही आपल्या कार्यपध्दतीमध्ये बदल करावा लागणार असल्याचे स्पष्ट करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंतर्भाव आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये केला पाहीजे.
आज कौशल्य शिक्षणाचा मोठा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये सुरु आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी शालेय जीवनापासूनच कौशल्य प्रशिक्षण सुरु झाले तर, विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होईल. त्यामुळेच कौशल्य प्रशिक्षणाचा विषय आता प्रत्येक शाळेमध्ये सक्तीचा करावा अशी विनंती आपण मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोचिंग क्लास ही सर्वात मोठी किड ही शिक्षण व्यवस्थेला लागली असून,आपल्या संस्थेतील विद्यार्थी कोचिंग क्लासला जाणे म्हणजे हे आपले अपयश आहे असे समजून कोचिंग क्लासला आमचा विद्यार्थी जाणार नाही हा संकल्प करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
विचारवंत डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांनी शालेय शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संरचना आणि पायाभूत सुविधा शाळांमध्ये निर्माण झाल्या पाहीजे. आता पाठ्यपुस्तक बनविण्यासाठी संस्थानाही मुभा देण्यात आली असल्याने शाळांना अभ्यासक्रम तयार करणे शक्य आहे.आज इंग्रजी माध्यमातून आपण शिक्षण देणार आहात तर, बिनभेसळीची शुध्द मराठी भाषा सुध्दा शिकवा तरच, आपली भाषा जीवंत राहील.
शाळांमध्ये स्मार्टफोन रोखण्याचा प्रयत्न निश्चित झाला पाहीजे. असे सुचित करुन, सहस्त्रबुध्दे म्हणाले की, यामुळे आपण चुकीच्या गोष्टींना निमंत्रण देत आहोत. जबाबदार पालकांनी केवळ शाळेवर अवलंबून राहु नये यासाठी आता पालकांचे प्रबोधन वर्गही शाळांमधून सुरु करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणातील आषय समजून घेतानाच गुणवत्तेच्या क्रमवारीत आपण कुठे आहोत हे सुध्दा पाहाणे आता संस्थाची जबाबदारी झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आमदार अमोल खताळ, शाम जाजू यांचीही भाषणं झाली. प्रास्ताविक ॲड.श्रीराम गणपुले यांनी केले. सूत्रसंचालन ईशान गणपुले यांनी केले तर आभार मुकुंद गाडगीळ यांनी मानले.
