सांस्कृतिक वर्चस्वाद्यांकडून झाकोळलेले संगमनेरचे सुवर्ण पान

Cityline Media
0
आद्य नृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर
रूढी,बंधने आणि प्रवाहाच्या विरोधातील पवळा यांचे पहिले पाऊल रंगमंचावर
कला अविष्कार म्हणजे मानवी मनाची सृजनशीलता, सौंदर्यदृष्टी आणि भावनांचे कलात्मक माध्यमांतून संगीत, नृत्य,नाट्य) केलेले प्रकटीकरण होय.ही अभिव्यक्ती संस्कृती, इतिहास आणि भावनांना पुढील पिढीपर्यंत पोहोचवते यातील वर्चस्ववाद्याने नेहमीच दुर्लक्षित ठेवलेले संगमनेरचे सुवर्ण पान म्हणजे हिवरगाव पावसा येथील  आद्य नृत्यांगणा पवळा भालेराव ‌हिवरगावकर आज ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करत असताना कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केले जातो.
महिला दिनानिमित्त कला,क्रीडा,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.त्यातून कर्तुत्ववान  महिलांच्या कार्य कर्तुत्ववावर मोहर उमटवली जात असल्याचे दिसून येते. तर इतिहासाच्या पानातील काही कर्तबगार महिलांचे कार्य भुतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळासाठी प्रेरणादायी ठरते.१९  व्या शतकात रूढीची बंधने,
पुरुषसत्ताक वर्ग व्यवस्थेला ठोकर मारत तमाशा लोककलेच्या रंगमंचावर प्रथम धाडसाने पहिले पाऊल टाकले.

आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर होय.जन्मजात प्रतिभा संपन्न सौंदर्य लाभले होते.पानाचा विडा जर खाल्ला तर त्या पानाचा लाल रंग त्यांच्या गळ्यातून दिसत असे पवळाचे देखणे रूप होते.पवळा यांना पाहण्यासाठी तिकीट काढून गर्दी करत असे ही इतिहासातील दुर्मिळ घटना आहे.

कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या दरबारात पठ्ठे बापूराव व पवळा  यांनी मिठाराणीचा वगनाट्य सादर केले.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या तमाशा कलाक्षेत्रात प्रथम पदार्पण करणाऱ्या महिला त्यांनी महाराष्ट्राच्या लावणीला मोठे वलय व उंची मिळवू दिली.परतु आज सांस्कृतिक वर्चस्वाद्यांकडून पवळा दुर्लक्षित राहिल्या तर सोशल मीडियाच्या जमान्यात पवळाच्या आत्मचरित्राला कॉपी पेस्ट वाल्यांचे ग्रहण लागले.

नुकतेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लावण्यवतींचा सन्मान मुंबईत करण्यात आला. आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी अद्वैत थिएटर्स आणि काली बिल्ली प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमेरिकेच्या लेखिका शैलजा पाईक यांच्या "द वल्गरिटी ऑफ कास्ट " या पुस्तकातून पवळा यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनात्मक लेखन केले आहे.त्यामुळे पवळांचे कला क्षेत्रातील योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे. 

- पवळा यांचा जन्म,कौटुंबिक पार्श्वभूमी व तमाशा क्षेत्रात प्रवेश
तमाशा क्षेत्रात प्रथम प्रदर्पण करणाऱ्या महिला आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर होय. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १८७०  रोजी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे भालेराव कुटुंबात झाला.वडिलांचे नाव ताबाजी भालेराव आईचे नाव रेऊबाई  भालेराव होते.

तबाजी भालेराव यांना दोन मुले व दोन मुली. मोठा मुलगा नामदेव त्यानंतर पवळा यांचा जन्म झाला पवळा यांना जन्मजात प्रतिभा संपन्न सौंदर्य लाभले. जणू काय तिला स्वरूप सुंदर अशी देणगी ईश्वराने जन्मजात दिली होती.परंतु रेऊबाई अचानक आजारी पडल्या.

गंभीर आजाराचे निदान झाले नाही. एक दिवस गावात एक ज्योतिषी आले रेऊबाईंनी हात दाखवून विनंती केली मला आजारातून वाचवा.ज्योतिषांनी हस्त रेखा पाहून भविष्य सांगितले.तुझी मुलगी पवळा हिला खंडेरायाला मुरळी सोडल्यानंतर तू सर्व आजारातून मुक्त होशील.
योगायोगाने आजार बरा झाला.

आपण दिलेला शब्द पाळावा लागेल,ना पाळल्यास देव कोपेल या भीतीने व अंधश्रद्धेच्या विचाराने रूपवान पवळाला रेऊबाईने खंडोबाच्या मंदिरात नेऊन भंडारा टाकला व तिला मुरळी सोडण्यात आले. त्यातूनच या कलेच्या सम्राज्ञीचा उगम होण्याचा मार्ग मिळाला. चालीरीती प्रमाणे पवळा चार-पाच घरी भिक्षा मागून देवाचे गाणे म्हणू लागली.

"मल्हारी माझा मल्हारी"
 भरतार माझा मल्हारी ||१||
खंडेराया होऊनी स्वार
 मिरवीत आला चौफेर
उठे ललकारी उठे ललकारी भरतार माझा मल्हारी ||२||

पवळाचे गाणे ऐकून अनेक जण प्रभावित होत आणि मंत्रमुग्ध होत असे.रुपवान तरुणी तालासुरात गाणे गाते याची माहिती सर्वदूर पसरली. मुंबईतील प्रसिद्ध तमासगीर नामा ढोलवडकर हे पवळाला आपल्या तमाशामध्ये नेण्यासाठी हिवरगाव पावसा येथे आले. त्यानंतर पवळा यांनी नामा ढोलवडकर यांच्या तमाशात प्रथम महिला कलावंत म्हणून प्रदर्पण केले.

नामा ढोलवडकर यांच्या तमाशात पवळाने आपल्या स्वरूप सुंदर सौंदर्य व गोड आवाजात भेदकी लावण्यानी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट घेऊन प्रेक्षकांना मोहन टाकले. पवळाच्या रूप सुंदर,कोकिळा आवाजाने नामा ढोलवडकरच्या तमाशाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध मिळाली.नामा ढोलवडकरच्या तमाशाची नावलौकिकता पाहण्यासाठी अनेक तमासगीर येत.नामा ढोलवडकर सह पवळा हिवरगावकर असा तमाशा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या झोतात आला.

 पवळा यांच्या सौंदर्याचे वैशिष्ट्ये नामचंद पवळा दिसायला इतक्या सुंदर होत्या की त्यांनी पानाचा विडा जर खाल्ला तर त्या पानाचा लाल रंग त्यांच्या गळ्यातून दिसत असे पवळाचे देखणे रूप होते.तमाशाच्या पुणे,मुंबई थेटरला हाउस फुल गर्दी होत असे.नामा ढोलवडकर यांच्या निधनामुळे पवळा व पठ्ठेबापूराव यांनी नवीन तमाशाचा फड सुरू केला.

त्यांच्या तमाशाने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवले.पवळा व पठ्ठेबापूराव
 या जोडीने महाराष्ट्राच्या कलारसीकांच्या मनावर अनेक काळ अधिराज्य गाजवले.कलावंताला पाहण्यासाठी तिकीट असणे दुर्मिळ घटना आहे मुंबईच्या पिला हाऊस (थिएटरला) हाउसफुल गर्दी होत असे.थेटरच्या आजूबाजूला दिवसभर रसिक पवळाला पाहण्यासाठी गर्दी करत असे. त्यामुळे पठ्ठेबापूराव यांनी थेटरचे मालक अंबु शेठ यांना पवळाला पाहण्यासाठी तिकीट लावण्याची युक्ती सुचवली.ही कल्पना थेटरचे मालक अंबुशेठ यांना पसंत पडली.

त्यांनी तशा प्रकारची जाहिरात लावली. प्रेक्षक एक आणे तिकीट काढून पवळा व पठ्ठेबापूराव यांना पाहत असे.पवळा यांना पाहायच्या तिकिटातून रोज १०० ते १२५ रुपये रोकड जमा होत असे.कोणत्याही कलावंताला पाहण्यासाठी तिकीट असणे हि दुर्मिळ घटना आहे.

पवळा या हिवरगाव पावसा आपल्या गावे आल्याची बातमी परिसरात समजले की परिसरातील तालुक्यातील श्रीमंत,धनिक टांगा करून पाहण्यासाठी येत असे पवळा या हिवरगाव पावसा येतील आपल्या वाड्यामध्ये चोपड्यावर बसलेल्या असायच्या आणि ती श्रीमंत,धनिक मंडळी पाहून परत जात असे.

 कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या दरबारात पवळा भालेराव यांचा सन्मान चांदीचे जोडे भेट :
कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या दरबारात  पठ्ठेबापूराव व पवळा भालेराव हिवरगावकर यांनी मिठाराणीचा वगनाट्य सादर केले.
मिठाराणीचे "वगनाट्य 
पठ्ठेबापूराव यांनी पवळाच्या सौंदर्यावर काढून शाहू महाराजांच्या व राणी साहेब यांच्यासमोर सादर केला.हे वगनाट्य पाहून शाहू महाराज व राणी साहेब खुश झाले
शाहू महाराज यांनी पठ्ठे बापूराव यांना जरीचा फटका व पवळाबाईंना चांदीचे जोडे बक्षीस दिले.

पवळा यांचे निधन : 
एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेले पवळा निष्कांचन, निराधार झाला. त्याच्या अखेरच्या दिवस हलाखीत काढावे लागले.शेवटी  दम्याचा आजार चढला त्यावर उपचार करण्याकरता त्या मुंबईला आपली भाची चंद्रकांत घोलप यांच्या घरी टंकण रोड (आत्ताचा मौलाना आझाद रोड) येथील  पिवळी माडी येथे राहण्यास गेल्या.आजाराचे स्वरूप डॉक्टरांना समजले नसल्यामुळे या आजारात वाचू शकल्या नाही.अखेर ६ डिसेंबर १९३९ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईत त्यांचा अंत झाला. एकेकाळी आपल्या गायन आणि नृत्यांनी प्रेक्षकांना वेड लावणारी नृत्यचंद्रिका लुप्त झाली,अनंतात विलीन झाली. त्यांचा पार्थिव देह सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे वरळी रोड येथील स्मशानभूमी पुरण्यात आला.त्यानंतरचे उत्तर कार्य तिचे भाचे लहुजी भालेराव, चंद्रिका घोलप व इतर नातेवाईकांनी पार पाडले.


कलेचा वारसा भाचे कलाभूषण लहुजी भालेराव :
 पवळा यांचे मोठे भाऊ नामदेव ताबाजी भालेराव यांचे ज्येष्ठ सुपुत्र कलाभूषण लाहुजी नामदेव भालेराव यांचा जन्म सन १९०१ मध्ये हिवरगाव पावसा येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले घरातील कर्त्या पुरुषाचे निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला हि वार्ता पवळा यांना समजले त्या तातडीने हिवरगाव पावसा येथे आल्या. भाऊ नामदेव यांचा अंत्यविधी व  उत्तर कार्य विधिवत केले. त्यानंतर कुटुंबाला हातभार लावता यावा म्हणून नामदेवचा मोठा मुलगा लहुजी नामदेव भालेराव आपल्या भाच्याला मुंबईला घेऊन गेल्या तेथे आपल्या ओळखीच्या तमाशा फडामध्ये तमाशा लोककला शिकण्यासाठी पाठवले पहिले तीन वर्ष कला शिकण्यासाठी  विनामूल्य काम केले. तीन वर्षानंतर दीडशे रुपये सालाने मानधन मिळू लागले. लहुजी भालेराव यांनी दहा वर्ष श्री भूमिका नृत्य सादर केले चाळीस वर्ष विनोदी सोंगाड्याचे भूमिका उत्कृष्टरित्या सादर करून रसिक मानावर राज्य केले.
पवळाबाई यांच्या कलेचा वारसा टिकवणारे पवळा यांचे भाचे लहुजी नामदेव भालेराव (थोरला भाऊ नामदेव यांचा मुलगा) यांनी  पवळा यांच्या सूचनेनुसार तमाशा क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला खंडू दगडू शिवनेकर यांच्या तमाशा मध्ये दहा वर्ष नृत्यकाम अत्यंत कुशलतेने सादर केले. अनेक वगनाट्य मध्ये स्त्रि भूमिका साकारली. शिवणेकरांच्या तमाशात लग्नाची बेडी,गुरु शिष्य,मैदाचे नगरी,अर्धशून्य या अनेक प्रकारच्या वर्गामध्ये स्त्रि भूमिका साकारली.त्यांनी पुणे,मुंबई थेटर वर लहुजी भालेराव सह दशरथ देवठाणकर यांच्याबरोबर सावळा कुंभार वगनाट्य सादर केले.कलाभूषण लहुजी भालेराव यांनी राजा हरिश्चंद्र,सवती मच्छर, म्युन्सिपाल्टी कायदा,चंद्रावर स्वारी अशा अनेक वगनाट्यातून लहुजी भालेराव यांनी सोंगाड्याची भूमिका साकारली.
समाज प्रबोधन केले व त्याचबरोबर पन्नास वर्षे तमाशा क्षेत्रात काम करून पवळा यांचा कलेचा वारसा टिकवला. पवळाचे भाचे कलाभूषण लहुजी भालेराव यांना महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक संचालनालय मार्फत मानधन देऊन उचित सन्मान केला.

कला सम्राज्ञी पवळा कला मंच संस्थेची स्थापना :
भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनानुसार सन १९९३ मध्ये लहुजी भालेराव हयात असताना लहुजी यांचा मुलगा चांगदेव लहुजी भालेराव व श्रीकांत ताबाजी भालेराव यांनी कला सम्राज्ञी पवळा कलामंच या संस्थेची हिवरगाव पावसा येथे स्थापन केली.
संस्थेमार्फत पवळा यांच्या कलेचा वारसा जतन करणे,स्मृतीचे जतन करणे,तमाशा क्षेत्रातील कलावंतांना कलावंतांच्या समस्या सोडविणे, लोककला जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करणे, प्रयोगात्मक लोककला सादर करणे,शालेय विद्यार्थ्यांना मार्फत लोककलेचे जतन करण्याचा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव आणि पवळा यांचे पणतू संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहे. 

सदर संस्थेला सन २०१७ मध्ये संस्कृतीक संचालनालय महाराष्ट्र शासन यांची मान्यता मिळाली. त्यानुसार दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रयोगात्मक लोककला सादर करणाऱ्या विद्यार्थ्याला १० ग्रेस गुणाची सवलत लागू झाली.

पवळा यांच्या प्रेरणादायी स्मारकाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित: 

पवळा यांचे नातभाचे चांगदेव लहुजी भालेराव यांनी  नाविन्यपूर्ण महान कलावंताचा सन्मान करणारा भव्य स्मारकाचा आराखडा तज्ञ अभियंतांकडून तयार करून घेतला आहे. सदरचा प्रस्ताव कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रस्ताव सन २०२० पासून ग्रामविकास खात्याकडे प्रलंबित होता.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुरामुळे सरदारचा प्रस्ताव जानेवारी २०२३ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मारकाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.शासनाने तात्काळ दखल घेऊन या महान कलावंताच्या स्मारकास मंजुरी द्यावी महान कलावंताचा सन्मान करावा या दृष्टीने मोठा संघर्ष,प्रयत्न
कुटुंबीय, कला सम्राज्ञी पवळा कला मंच व हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीने चालू आहे.

-स्मारकाचे वैशिष्ट्य: 
स्मारकामध्ये भव्य असा प्रेक्षक हॉल,संग्रहालय,भिंतीशिल्प, वाचनालय,लोककला अभ्यासकांसाठी लोककला अभ्यासिका,प्रशिक्षण हॉल,
पवळा यांचा भव्य बारा फुटी पुतळा, सुंदर असे गार्डन,शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोगात्मक लोककला प्रकारांतर्गत प्रशिक्षण व दहावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणाचे सवलत करिता कार्यक्रमांचे विशेष आयोजन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशाप्रकारे भव्य स्मारकामुळे पवळांची स्मृतीचे व इतिहासाचे शेकडो पिढ्या जतन केले जाणार आहे.


 पवळा यांचा छत्रपती शाहू महाराज यांच्या दरबारातील फोटो :
आद्यनृत्यांगना पवळा भालेराव हिवरगावकर यांचा सुरेख सुंदर असा शाहू महाराजांच्या दरबारात चित्रकारांनी काढलेला फोटो भालेराव कुटुंबियांकडे उपलब्ध आहे. पवळा यांचे नातभाचे चांगदेव लहुजी भालेराव यांनी सदरचा फोटो प्रयत्न करून प्राप्त केला.

 आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या चरित्राचे लेखन 

पवळाचे भाचे कलाभूषण लहुजी भालेराव यांनी पवळा यांचा जीवन प्रवास सर्वात जवळून पाहिला आहे.लहुजी यांच्या हयातीत नातभाचे चांगदेव लहुजी भालेराव यांनी पवळा यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना,कला क्षेत्रातील प्रवेश व योगदानाची माहिती, जन्म पासून मृत्यू पर्यंतचा जीवन प्रवास लेखणीबाद्ध केला. इतर लेखकांनी लिहिलेले लेखन आणि लहुजींनी अनुभवलेल्या पवळा यांचे तुलनात्मक अभ्यासपूर्ण लेखन नातभाचे चांगदेव लहुजी भालेराव यांनी केले.त्यामुळे दुर्लक्षित राहिलेल्या पवळांची सत्य माहिती, चरित्रात्मक लेखन उपलब्ध झाले आहे.याचा लोककला अभ्यासक,लेखक,पत्रकार यांच्यासाठी मोठा आधार व लिखित पुरावा उपयुक्त ठरत आहे.

कला सम्राज्ञी पवळा कला मंचाच्या कार्याचे शासन दरबारी दखल :
 सन १९९२ पासून संस्थेच्या प्रयत्नामुळे आता कुठे शासन दरबारी पवळा यांच्या कार्याचे दखल घेतली आहे.
  १) दिनांक १९ जुलै २०२२ रोजी सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र शासन शासन निर्णयानुसार पवळा ताबाजी भालेराव हिवरगावकर राज्य सांस्कृतिक पुरस्कारास नाव देण्यात आले. सदर पुरस्कार राज्यातील वरिष्ठ लोककलावंताला तीन लाख रुपयांचा पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दिला जात आहे.

  २)दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र शासन शासन निर्णयानुसार पवळा ताबाजी भालेराव यांच्या छोटेखानी कार्यक्रमासाठी २ लाख रुपयांची   तरतूद करण्यात आली आहे.

 ३) केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून सन २०२४-२५ मध्ये 
२० लाख रुपये भव्य पवळा सामाजिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये नामदार आठवले यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

 ४)नाशिक पुणे महामार्गावर नामचंद पवळा हिवरगावकर जन्मभूमी दिशादर्शक फलक ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांनी लावला आहे.

 कला सम्राज्ञी पवळा कला मंचा मार्फत सामाजिक उपक्रमांचे आयोजन:
पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या कलेचा वारसा लहुजी भालेराव यांनी पुढे चालविला त्यांचे नातभाचे चांगदेव लहुजी भालेराव यांनी कला सम्राज्ञी पवळा कला मंचाच्या माध्यमातून उपेक्षित,दुर्लक्षित पवळा यांना वर्तमान समाजासमोर आणण्याचे मोठे  कार्य केले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. पवळांचे भाचे कला भूषण लहुजी भालेराव नातवाचे चांगदेव लहुजी भालेराव संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी मोठ्या उदात्त हेतूने संस्थेची स्थापना केली आहे.पवळा यांचे पणतू नितीनचंद्र भालेराव व अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी सन २०१८ पासून संस्थेच्या कामाला गती दिली आहे. संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी लोक कलावंत तमाशा कलावंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.महापुरुषांच्या समाजसुधारकांच्या जयंती महोत्सवानिमित्त सांस्कृतिक  कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रमांचे आयोजन,
चित्रकला स्पर्धा,आधार कॅम्प,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जात आहे.कला सम्राज्ञी पवळा कला मंच व महात्मा फुले डॉ.आंबेडकर राजश्री शाहू विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केला जात आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पवळांचा मरणोत्तर सन्मान पुरस्कार :

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव टिकवणाऱ्या आणि मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लावण्यवतींचा सन्मान मुंबईत करण्यात आला आहे.अद्वैत थिएटर्स आणि काली बिल्ली प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने
महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन  पु.ल.देशपांडे मिनी ऑडिटोरियम,रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे बुधवार दि.२४ डिसेंबर रोजी केले होते.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या तमाशा कलाक्षेत्रात प्रथम पदार्पण करणाऱ्या महिला त्यांनी
महाराष्ट्राच्या लावणीला मोठे वलय व उंची मिळवू दिली अशा 
आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांना महाराष्ट्राची लावण्यवती मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पवळांच्या कला क्षेत्रातील योगदानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर   संशोधन व लेखन :  
आंतरराष्ट्रीय लेखिका प्रा.शैलजा पाईक यांनी त्यांच्या 
"द वल्गरिटी ऑफ कास्ट" दलित, लैंगिकता आणि मानवता आधुनिक भारतातील या पुस्तकातून आधुनिक महाराष्ट्रातील जात,वर्ग,लिंग,
लैंगिकता आणि लोकप्रिय संस्कृतीच्या राजकारणाचे विश्लेषण केले आहे.या पुस्तकाच्या माध्यमातून कलाक्षेत्रातील नामवंत महिला कलाकार यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर,राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर,कांताबाई सातारकर,सुरेखा पुणेकर यांच्यासह इतर महिला कलाकारांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनात्मक लेखन केले आहे. 
या पुस्तकामध्ये आद्य नृत्यांगना पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ७५ पानापेक्षा जास्त जागा या व्यक्तिमत्त्वा साठी दिलेली आहे.या पुस्तकाच्या लेखनासाठी त्यांना २०२४ च्या मॅकआर्थर फाउंडेशनची ७.५ कोटींची "जीनियस" फेलोशिप मिळाली आहे.त्यामुळे पवळांचे कला क्षेत्रातील योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे. 

पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी हिवरगाव पावसा ग्रामपंचायत केला ठराव : 

हिवरगाव पावसा ग्रामपंचायतने २६ जानेवारी २०२५ रोजी ऐतिहासिक ठराव करत 
आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी बहुमताने ठराव मंजूर केला.केंद्र सरकारने पवळांच्या अद्वितीय कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन  भारतरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान केल्यास तमाशा कला क्षेत्रासाठी एक सुवर्णक्षण ठरेल. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला जागतिक महिला दिनानिमित्त सलाम! 
नितीनचंद्र चांगदेव भालेराव
 (सचिव) कला सम्राज्ञी पवळा कला मंच हिवरगाव पावसा, तालुका संगमनेर,जिल्हा - अहिल्यानगर 
 *मोबाईल ९४०५४०४६४३
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!