आश्वी संजय गायकवाड चक्रवर्ती सम्राट अशोक हे संपूर्ण जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ शासकांपैकी एक आहेत.त्यांचे विशाल साम्राज्य अफगाणिस्तान पासून तामिळनाडू पर्यंत पसरले होते. ते एकमेव असे योद्धा सम्राट होते,ज्यांनी कलिंग युद्ध जिंकल्यावर युद्धाला साम्राज्य विस्ताराचे साधन म्हणून कायमचे सोडून दिले.त्यांनी सार्वजनिक घोषणा केली होती, “यापुढे मी जग जिंकण्यासाठी युद्धे आणि लढाया करणार नाही,तर न्याय आणि सदाचाराद्वारे जिंकणार.”पुढे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून अहिंसेचा मार्ग निवडला म्हणूनच अशोकाचा वैश्विक आदर्श वाखण्याजोगा आहे.
सम्राट अशोक यांना यांना फक्त मोठ्या साम्राज्य विस्ताराबद्दल महान मानले जात नाही.ते खऱ्या अर्थाने महान आहेत कारण त्यांनी मानव जातीच्या स्वातंत्र्याची भावना जोपासली, ज्ञानाबद्दल प्रेम बाळगले,त्यांची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय धोरणे भगवान बुद्धाच्या धम्मावर आधारित होती आणि धम्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.
या सत्य व न्यायाच्या भावनेमुळे ते सायबेरिया पासून श्रीलंके पर्यंत सत्य धर्माचे रक्षक म्हणून ओळखले जातात.असे अनिल मुन्तोडे यांनी सांगितले की, “कोणत्याही अन्य भारतीय सम्राटाच्या यशाचा अशोकाइतका दूर-दूरपर्यंत प्रसार झाला नाही आणि कोणत्याही राजाने इतिहासावर इतका दीर्घकाळ व गहन प्रभाव पाडला नाही.”
सम्राट अशोक मौर्य वंशातील असूनही त्यांच्या नावासोबत ‘मौर्य’ हे प्रत्यय फारसे वापरले जात नाही. त्यांच्या आजोबा चंद्रगुप्त मौर्य प्रमाणे त्यांना ‘अशोक मौर्य’ असे संबोधले जात नाही. ते अधिक लोकप्रियपणे धम्म अशोक किंवा प्रियदर्शी अशोक म्हणून ओळखले जातात.
आश्वी खुर्द येथील सम्यक बुद्ध विहार येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अनिल मुन्तोडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखेचे अध्यक्ष दत्तराज मुन्तोडे होते.मंचावर महिला विभागाच्या अध्यक्ष पुजा मुन्तोडे व माळेवाडी ग्राम शाखेचे प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष रोहिदास मुन्तोडे उपस्थित होते.
प्रास्ताविकात सरचिटणीस राजेंद्र मुन्तोडे यांनी सम्राट अशोक यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकला. पुजा मुन्तोडे व दत्तराज मुन्तोडे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व धार्मिक कार्यांची माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभागाचे सचिव सुशील मुन्तोडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अभियंता कल्याणी कदम यांनी केले.
यावेळी उपस्थित महिलांनी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
