झाडांची छाटणी,खड्डे बुजवले, स्ट्रिट लाईट सुरू; विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा दिलासा
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या आश्वी खुर्द – हनुमानवाडी – दाढ खुर्द या सुमारे तीन किलोमीटर रस्त्याचा गुदमरलेला श्वास अखेर मोकळा झाला आहे.
आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून या रस्त्यावरील झाडांची छाटणी केली,खड्डे बुजवले आणि बंद पडलेल्या स्ट्रिट लाईट सुरू केल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडांमुळे हा मार्ग धोकादायक बनला होता.
झाडांच्या दाट फांद्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्ट्रिट लाईट अडकून बंद पडल्या होत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावर अंधार पसरत होता. शिवाय झाडांच्या आक्राळ-विक्राळ वाढीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर ओलाव्याचा परिणाम होत होता. या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
परिणामी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.या रस्त्याचा वापर वाल्हेकर, दातीर, भालेराव, भोसले, गायकवाड, मोरे, गुणे, सोनवणे, भवर, खर्डे, मांढरे, शिंदे, गव्हाणे आदी कुटुंबांसह गावातील मोठा भाग करत असल्याने या रस्त्यावरील वर्दळ मोठी आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या समस्येबाबत ग्रामपंचायत सरपंच सौ. अलका गायकवाड, उपसरपंच बाबा भवर, तसेच सदस्य संजय भोसले, सोपान सोनवणे, सागर भडकवाड यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी आमदार ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक बापूसाहेब गायकवाड यांनाही या समस्येची माहिती देण्यात आली.
यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वनविभागाकडे लेखी निवेदन देऊन झाडांची छाटणी करण्याची परवानगी घेतली. परवानगी मिळताच झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या व काही झाडे हटविण्यात आली. त्यानंतर तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आणि स्ट्रिट लाईट पुन्हा सुरू करण्यात आल्या.
काही दिवसांपूर्वी आमदार ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रस्त्यालगत असलेल्या निलेश भवर यांच्या वस्तीवर ग्रामस्थांची बैठक घेतली होती. त्या वेळी ग्रामस्थांनी रस्त्याची समस्या त्यांच्या समोर मांडली होती. यानंतर त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत लवकरच या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे व रस्ता रुंदीकरण करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे आता हा रस्ता स्वच्छ, प्रकाशमान आणि सुरक्षित झाला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थीही निर्धास्तपणे शाळेत जाऊ लागले असून शेतकऱ्यांच्या अडचणीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.या कामाबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
-रस्त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर होणार
गेली दोन वर्षापासुन या रस्त्याचा वापर करणारे शालेय विद्यार्थी पालक शेतकरी प्रवाशी जिव मुठीत धरुन प्रवास करत मात्र अनेक वेळा प्रयत्न करूनही तांत्रिक अडचणी येत होत्या अखेर ग्रामस्थ व ग्रा.प. पदाधिकाऱ्यांच्या प्रयन्तातुन हा प्रश्न सुटला तसेच राज्याचे जलसंधारण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातुन सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रस्ते विकासासाठी आश्वी खुर्द ते हनुमानवाडी दाढ खुर्द रस्त्यास रुपये तीन कोटी निधी मंजुर झाला आहे लवकरच उद्घाटन व कामाला सुरुवात होणार
सौ.अलका बापुसाहेब गायकवाड
प्रथम महिला लोक नियुक्त सरपंच आश्वी खुर्द
