नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा उत्साहात
कोल्हार अरुण बोरूडे गुढीपाडव्याचा मुहूर्त हिंदू नववर्षानिमित्त कोल्हार भगवतीपूर गावातील सर्व मंदिरांवरील जुने ध्वज बदलवून त्याजागी नवीन भगवे ध्वज उभारण्यात आले. दरवर्षी उत्साहात हा उपक्रम राबविला जातो. हाती भगवे ध्वज घेत सनई चौघड्यांच्या स्वरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा परिधान करीत ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीफळ वाढवून ध्वज बदलविण्यास प्रारंभ झाला.मिरवणुकीत डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून पारंपरिक वेशभूषा केलेले ग्रामस्थ व तरुण हाती भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होते. छत्रपती चौक, भगवतीदेवी कमान, तालीम, भगवतीदेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, श्रीराम मंदिर, गणपती मंदिर, गुरुदेव दत्त मंदिर, हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर, मुनिसुव्रतस्वामी मंदिर, महादेव मंदिर, शनी मंदिर, सप्तशृंगी मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मुंजोबा मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, विश्वकर्मा मंदिर, बिरोबा मंदिर, पाटीलबा मंदिर, कानिफनाथ मंदिर आदी मंदिरांवर नूतन भगवे ध्वज उभारण्यात आले.
मिरवणुकीची सांगता स्व. माधवराव खर्डे चौकात झाली. यावेळी चौकात भगवा ध्वज उभारून डॉ सुनील खर्डे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी त्यांनी शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थांना हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत जागतिक घडामोडींमुळे वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत युद्धजन्य परिस्थिती लवकर संपून सर्वसामान्यांचे जीवन सुरळीत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामराव गोसावी यांनी यावेळी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत वडगावपान येथील १२ वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
यावेळी भगवतीपूर पोलीस पाटील सुखलाल खर्डे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामराव गोसावी, पत्रकार सुहास वैद्य, रंभाजी बोरुडे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुल रांका, शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष अमोल खर्डे, सोन्याबापू मोरे सर, मयुर बंग, राहुल भावसार, प्रसाद दळवी, भाजपा तालुका उपाध्यक्ष अक्षय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विश्वस्त व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित मोरे व बालरोगतज्ञ डॉ. सुनील खर्डे यांच्या पुढाकारातून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वैद्य यांनी केले.
याप्रसंगी सुखलाल खर्डे, डॉ जयराम खंडेलवाल, अमोल खर्डे,अनिल भनगे, किरण तांबे, दिपक डंक, मयुर बंग, आनंद रांका, योगेश मुथ्था,नवीन पटेल, बापू दळवी, महेश राऊत, महेश फलटणे,डॉ उद्धव काळोखे,कौशल दळवी, मोहित हिरानंदानी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
