शहरातील अवैध धंद्याबाबत मा.नगसेवक मुशीर सय्यद यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार
नाशिक दिनकर गायकवाड नाशिकमध्ये अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट होत असल्याचा गंभीर आरोप करून मा.नगरसेवक मुशीर सय्यद यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू असून,याशिवाय मटका,जुगार,रोलेट, गावठी दारू,अमली पदार्थ विक्री आणि गुटखा विक्री यासारखे विविध बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सिहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न सुरू
असताना असे प्रकार शहराच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचे सय्यद यांनी नमूद केले आहे. शहरात सुमारे २०० मसाज पार्लरच्या माध्यमातून देहविक्री सुरू असल्याचा दावा करत त्यांनी नाशिकमध्ये आंबट शौकिनांना आता बँकॉकला जाण्याची गरज नाही,अशी चर्चा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, प्रत्येक अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना दरमहा सुमारे ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत हप्ते दिले जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. नाशिकमधील सर्व अवैध धंदे तत्काळ बंद करावेत,अशी मागणी सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
