नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहरात विनापरवाना शस्त्र कोयता बाळगणाऱ्यां विरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून,आडगाव परिसरातील माडसांगवी येथे कोयत्याचा धाक दाखवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की समाधान काळू बदादे (वय ३२, रा. म्हसोबावाडी, माडसांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
माडसांगवी परिसरात एक व्यक्ती हातात धारदार कोयता घेऊन फिरत नागरिकांना घाबरवत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर
दखल घेतली. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तातडीने गुन्हे शोधपथकाला कारवाईचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना गुप्त माहितीदारामार्फत संशयिताच्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानुसार माडसांगवी येथील वैष्णवी लॉजच्या मागील परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.झडती दरम्यान त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, तसेच सहायक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग)शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्चात गुन्हेशोध पथकाने केली.
