लोणी प्नतिनिधी कलावंत विचार मंच,नाशिक आणि कमल फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री उद्योग समूह, नाशिक यांच्या सौजन्याने 'कलावंत पुरस्कार सोहळा २०२६' हा कार्यक्रम १९ एप्रिल रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील अभिनेता ज्ञानदेव शिंदे यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अभिनेते ज्ञानदेव शिंदे यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे या सोहळ्यात त्यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुनिल मोंढे यांनी दिली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा प्रसिद्ध लेखक डॉ. बी. जे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.कला,साहित्य व चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची रंगत वाढणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्थळ प. सा. नाट्य मंदिर, नेहरू गार्डनजवळ, नाशिक असे निश्चित करण्यात आले आहे.सांस्कृतिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असल्याने नाशिकच्या कलारसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यस्तरीय स्तरावर होत असलेल्या या सन्मानामुळे युवा कलावंतांना प्रेरणा मिळणार असून,विविध कलाक्षेत्रांतील गुणवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
