नाशिक दिनकर गायकवाड मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला नाशिक गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश आंबेकर हा गुन्हा घडल्यापासून चार वर्षांपासून आपले अस्तित्व लपवून फरार होता.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे
शाखा युनिट २ चे पथक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, आकाश आंबेकर हा नाशिकरोड परिसरातील दसकगाव येथे वावरत असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
शंकर काळे व विलास गांगुर्डे यांना मिळाली होती. त्या माहिती वरुन पथकाने दसकगाव येथे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई गुन्हेशाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, मुक्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, विलास गांगुर्डे, शंकर काळे, गुलाब सोनार, सुनिल आहेर, वाल्मीक चव्हाण आदींसह गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने केली.
