१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, ज्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो.
एखाद्या छोट्याशा स्वप्नातून दिव्य वास्तवात उतरावे, तसाच काहीसा आजचा लेखन प्रवास. आपल्या प्रांत प्रिय महाराष्ट्र राज्याचा राहिला आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग आणि राकट डोंगर रांगांच्या कुशीत वसलेला हा महाराष्ट्र म्हणजे केवळ एक भौगोलिक प्रदेश नसून ती एक जाज्वल्य संस्कृती आणि थोर परंपरा आहे.
दरवर्षी १ मे हा दिवस आपण अत्यंत उत्साहात 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा करतो. हा दिवस केवळ आनंदाचा उत्सव नाही, तर तो आपल्या राज्याच्या निर्मितीसाठी दिलेल्या असिम बलिदानाची आणि संघर्षाची आठवण करून देणारा एक ऐतिहासिक क्षण आहे.
१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि या मंगल कलशाच्या स्थापनेसाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून उभा राहिलेला तो लढा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटवतो. राज्याची निर्मिती करताना "महाराष्ट्र माझा" असे म्हणताना त्या शब्दांत केवळ मालकी हक्क नसून एक मोठी जबाबदारी दडलेली आहे.
महाराष्ट्राच्या या वैभवशाली प्रवासाचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापन केले नाही, तर त्यांनी 'रयतेचे राज्य' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले,तर रयतेच्या भाजीच्या देठाला विध्वंसाचे हात लागु नये याची काळजी घेतली.
गडकिल्ल्यांच्या रूपाने त्यांनी उभी केलेली ही अभेद्य सुरक्षा आजही आपल्याला संकटात धैर्याने उभे राहण्याची शिकवण देते.त्यांनी दिलेला 'स्वधर्म' आणि 'स्वराज्य' हा मंत्रच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कृतीशील कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा ठरला.
आजचा आधुनिक महाराष्ट्र जो प्रगतीचा मार्ग चोखाळत आहे,त्याचे मूळ महाराजांच्या दूरदृष्टी मध्ये आहे.आरमार उभे करून समुद्रावर वर्चस्व गाजवणारे ते पहिले भारतीय राजे होते, म्हणूनच त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आणि स्वराज्याची नीतिमत्ता आजही आपल्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
आपल्या या महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक ऋषीमुनींच्या वाणीतून झिरपणारी अमृतधारा आजही आपल्या विचारांवर संस्कार करत आहे.संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पायावर तुकोबांनी कळस चढवला,पण तो 'महाराष्ट्र धर्म' प्रत्यक्ष न्यायाच्या वाटेने सुरक्षित ठेवण्याचे कार्य शिवरायांनी केले.
सामाजिक क्रांतीच्या बाबतीतही महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्त्रियांच्या शिक्षणाची कवाडे खुली करणारे महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने जे अफाट कार्य केले, त्यांना त्रिवार मुजरा करणे हे आपले कर्तव्यच आहे. त्यांच्या प्रचार आणि प्रसारामुळेच आज महाराष्ट्रातील स्त्री सुरक्षित आणि सुशिक्षित होऊन जगाच्या पाठीवर आपले नाव उज्ज्वल करत आहे.
महाराष्ट्राचा आधारस्तंभ हा इथला नीतीमान आणि निर्व्यसनी तरुण आहे. बलवान विचार आणि कणखर नीतिमत्ता असलेल्या लोकांच्या जोरावरच आज महाराष्ट्र देशात एक शक्तिशाली राज्य म्हणून उभे आहे.आजच्या घडीला महाराष्ट्र शैक्षणिक,औद्योगिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत आहे. पण ही प्रगती साधताना आपल्या मातीशी असलेले नाते अधिक घट्ट करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र दिन साजरा करताना आपण केवळ ध्वजारोहण किंवा भाषणे करून थांबता कामा नये, तर हे राज्य अधिक समृद्ध, प्रदूषणमुक्त आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत.
ज्या महाराष्ट्रात संतांच्या वाणीतून संस्कारांची अमृतधारा वाहते, जिथे शूरवीरांच्या पराक्रमाचा इतिहास प्रत्येक दगडात कोरलेला आहे, त्या राज्याचे आपण नागरिक आहोत याचा सार्थ अभिमान बाळगायला हवा. शेवटी, महाराष्ट्र म्हणजे एक विचार आहे,जो आपल्याला सामर्थ्यवान, चारित्र्यवान आणि ध्येयनिष्ठ बनण्याची शिकवण देतो.अशा या वैभवशाली महाराष्ट्राला आणि इथल्या कर्तृत्ववान जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
