लोणी रुपाली भालेराव महाराष्ट्रात एप्रिलच्या अखेरीस उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून,विदर्भ,मराठवाडा आणि खानदेशात तापमान ४०-४५ सेल्सिअसच्या पार गेले आहे तसेच राहाता तालुक्यातील लोणी येथे देखील अशाच प्रकारच्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी,असा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्याबाबत लोणीकरांनी देखील सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाच्या तीव्रतेने गेल्या काही दिवसांपासून तापमानात होणारी वाढ आणि सूर्याचा वाढता प्रादुर्भाव यामुळे लोणी आणि परिसरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
एरवी गजबजलेल्या असणाऱ्या या रस्त्यावर केवळ मोजकीच वाहने धावताना दिसत होती. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे स्पष्ट चित्र या ठिकाणी दिसत आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकान समोरही ग्राहकांची वर्दळ कमालीची घटली असून, उष्णतेपासून वाचण्यासाठी लोकांनी सावलीचा आश्रय घेतला आहे.
विशेषतःदुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. विद्युत खांबांवरील जाहिरातींचे फलक आणि रिकामे पदपथ उन्हाच्या तीव्रतेची साक्ष देत आहेत.परिसरातील झाडे देखील या रणरणत्या उन्हात होरपळून निघाली असून,अधून मधून जाणाऱ्या दुचाकी स्वारांव्यतिरिक्त संपूर्ण रस्ता शांत दिसत होता.
वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभागाने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.दुपारी घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधणे,पुरेसे पाणी पिणे आणि शक्य असल्यास सावलीत राहण्याचा सल्ला दिला जात आहे.पुढील काही दिवस तापमानाचा हा पारा असाच चढा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, यामुळे शेती कामावर आणि स्थानिक बाजार पेठेवरही परिणाम झाला आहे.
एकूणच, लोणीतील आजूबाजूच्या परिसरात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवत असून दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. उन्हाची वाढती तीव्रता आणि त्याचे परिणाम टाळण्यासाठी सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे,भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे
