लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील लोणी येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रयत एक्सलन्स अकॅडमीने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात या अकॅडमीची विद्यार्थिनी कु.वीरा सुनील नवगण हिने ९०.५० शेकडा गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
तिच्या या विशेष यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक केले जात असून शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.कु.वीरा हिने मिळवलेल्या या यशामागे तिची मेहनत आणि विद्यालयातील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
तिला प्रामुख्याने मार्गदर्शक शिक्षिका सौ.डोखे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.केवळ कु.वीराच नव्हे,तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अत्यंत चांगल्या गुणांनी यश प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या या सर्वांगीण प्रगतीमुळे शाळेचे,वर्गशिक्षकांचे आणि पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्याच्या काळात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सर्वत्र महागडे होत चालले आहे. मात्र,अशा परिस्थितीतही रयत एक्सलन्स अकॅडमीने कमीत कमी शुल्कात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा वसा घेतला आहे. महागड्या शाळांच्या तुलनेत तितकेच दर्जेदार शिक्षण देऊन उत्तम व गुणवंत विद्यार्थी घडवण्यामध्ये या शाळेने आणि येथील शिक्षकांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी विद्यालयाप्रती समाधान व्यक्त केले आहे.वीरा नवगण हिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
