राहुरीत मोठा राजकीय भूकंप विखे चव्हाणांची शिष्टाई यशस्वी

Cityline Media
0
प्राजक्त तनपुरेंच्या भूमिकेमुळे अक्षय कर्डिलेंचा मार्ग सुकर


झरेकाठी सोमनाथ डोळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे.राहुरी मतदारसंघात सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय घडामोड घडली.भाजपचे संकटमोचक मानले जाणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि मा.मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या 'तनपुरे वाड्यावर' धाव घेतली.या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या शिष्टाईमुळे राहुरीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून,भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग आता सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
'तनपुरे वाड्यावर' बंद दाराआड खलबतं
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील अचानक प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी पोहोचले.यावेळी या नेत्यांमध्ये बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा झाली.राहुरीतील निवडणुकीत महायुतीला बळकटी देण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी ही भेट झाल्याचे समजते.या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी तनपुरे यांना निवडणूक न लढवण्याबाबत किंवा अनुकूल भूमिका घेण्याबाबत विनंती केली.यावर प्राजक्त तनपुरे यांनी थेट कोणताही निर्णय न घेता, "मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईन," अशी भूमिका मांडली आहे.
विखे-चव्हाण जोडीचा 'मास्टरस्ट्रोक'
अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर राधाकृष्ण विखे पाटील यांची मजबूत पकड आहे. त्यातच भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांची रणनीती कामी आली आहे.राहुरी मतदारसंघात अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत होईल,असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला होता. मात्र, मतदानापूर्वीच विखे-चव्हाण जोडीने तनपुरेंच्या वाड्यावर जाऊन केलेली ही शिष्टाई महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक' मानली जात आहे. यामुळे कर्डिले यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आता मवाळ होताना दिसत आहे.
अक्षय कर्डिलेंना मोठे बळ; विरोधक बॅकफूटवर
प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या या नरमाईच्या भूमिकेमुळे अक्षय कर्डिले यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जर तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला झाले किंवा त्यांनी निवडणुकीत सक्रिय विरोध कमी केला, तर कर्डिले यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी राहील, असे बोलले जात आहे. या घडामोडीमुळे महाविकास आघाडीच्या गोटात मात्र चिंतेचे सावट पसरले असून, विरोधकांपुढे आता रणनीती बदलण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मक संकेत दिले.ते म्हणाले, "प्राजक्त तनपुरे हे समंजस नेते आहेत.आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, ते जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या हितासाठी सकारात्मक विचार करतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे."भविष्यातील मोठ्या पुनर्रचनेचे संकेत?प्राजक्त तनपुरे यांची ही भूमिका केवळ या निवडणुकीपुरती मर्यादित आहे की भविष्यात ते महायुतीसोबत जाणार, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.तनपुरे यांनी 'कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ' असे म्हटले असले तरी, विखे आणि चव्हाणांसारखे दिग्गज नेते त्यांच्या दारी आल्याने राहुरीच्या राजकारणाने आता अनपेक्षित वळण घेतले आहे.

आता आगामी २४ तासांत प्राजक्त तनपुरे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय अधिकृत घोषणा करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या नाट्यमय घडामोडीचा राहुरीच्या निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!