लोणी प्रशांत कांबळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित ‘गोदा ते नर्मदा - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा’ भव्य शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.
अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वर येथे या जलयात्रेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इंदौर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर बहादुर यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री . दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ आणि रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र चौंडी येथे जलयात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मंत्री गिरीश महाजन व खासदार रामराव वडकुते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
“वारसा, विचार आणि विकास” या संकल्पनेवर आधारित ही जलयात्रा दिनांक २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभर प्रवास करत जलव्यवस्थापन, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी जलटंचाई, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि पाण्याच्या शाश्वत वापराची गरज या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर समाजमन जागृत करण्याचा प्रभावी संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
ही जलयात्रा केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता, “पाणी हीच जीवनरेखा” या जाणिवेला समाजमनात दृढ करणारी परिवर्तनाची चळवळ ठरणार आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, यासाठी ही जलयात्रा प्रेरणादायी ठरेल.शासन, प्रशासन आणि जनसहभाग यांच्या एकत्रित शक्तीतून जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन घडवत,भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध जलभविष्य निर्माण करण्याचा ठाम संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
