पालकमंत्री ना.विखे पाटलांनी जोर्वे येथे प्रवरेच्या पाण्याचे पूजन केले
संगमनेर प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांना ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा मोठे पाठबळ देणारी ठरेल, असा ठाम विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री क्षेत्र जोर्वे येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रवरा नदीच्या पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी जलकलश विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यात्रेचा मुख्य उद्देश स्पष्ट करताना नामदार विखे पाटील म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे,तर एक कुशल प्रशासक म्हणून जलव्यवस्थापन आणि जल संवर्धनात दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच कार्याची प्रेरणा घेऊन लोकसहभागातून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.”
जलसंपदा विभागाच्या वतीने राज्यात प्रथमच अशा अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रमुख ३० नद्यांचे जलकलश एकत्रित करून ते शिर्डीमध्ये संकलित केले जातील.त्यानंतर ही जलयात्रा नर्मदा नदीच्या दिशेने प्रस्थान करेल,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या जलयात्रेचे उद्या शनिवारी सायंकाळी ६ वाजता संगमनेर शहरात आगमन होणार आहे. यानिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. अहिल्यादेवींनी जीर्णोध्दार केलेल्या शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात महाआरती संपन्न होणार आहे. त्यानंतर रविवारी प्रवरा माईचे पुन्हा पूजन करून जलकलश यात्रेत सहभागी होईल.
