'सुंदर लोणी,स्वच्छ लोणी' मोहिमेला वेग
लोणी रुपाली भालेराव राहूता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील बस स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेला कचरा आणि अस्वच्छतेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. 'सुंदर लोणी, स्वच्छ लोणी' या संकल्पनेतून आज या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बस स्थानकाच्या मुख्य भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि कचरा साचल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
या समस्येची दखल घेत स्थानिक पातळीकडून कार्यवाही करण्यात आली आहे.या स्वच्छता मोहिमेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला असून सानी कंपनीच्या मोठ्या हायड्रोलिक एक्सकॅव्हेटरच्या साह्याने साचलेला कचरा आणि माती उपसण्याचे काम सुरू आहे.
उपसलेला हा कचरा मोठ्या डंपरच्या माध्यमातून शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या भिंतीवर कचरा साचला होता, त्याच भिंतीवर 'सुंदर लोणी, स्वच्छ लोणी' असे घोषवाक्य लिहून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्याचे कामही समांतर पद्धतीने सुरू आहे.
या मोहिमेमुळे बस स्थानक परिसराने आता मोकळा श्वास घेतला असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे.लोणी हे प्रवरा परिसरातील एक महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांमध्ये महिला, लहान मुले, तसेच वृद्ध व्यक्ती यांचाही समावेश असतो या सर्वांचा विचार करता कोणालाही आरोग्याच्या बाबतीत त्रास होऊ नये याची काळजी घेतलेली ही दिसून येते बस स्थानक परिसरात होणारी ही स्वच्छता केवळ सौंदर्यीकरणासाठी नसून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे.
कचरा पूर्णपणे हटवल्यानंतर या जागेचा वापर पुन्हा कचरा टाकण्यासाठी होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाकडून पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. या स्वच्छता मोहिमेचे प्रवाशांकडून आणि स्थानिक ग्रामस्थांकडून स्वागत होत असून,संपूर्ण लोणीत स्वच्छता अशाच प्रकारे राहील अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.स्वच्छतेच्या या कामामुळे परिसरातील व्यावसायिक आणि वाहनधारकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
