लोणी खुर्द ज्ञानेश्वर साबळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील संकल्प सांस्कृतिक भवन येथे' बुद्ध वंदना ग्रुप, लोणी,अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच शब्दगंध साहित्य परिषद, राहाता तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुले- शाहू- आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता' या विषयावर वैचारिक परिसंवाद उत्साहात पार पडला.
परिसंवादात विविध मान्यवर वक्त्यांनी आपले विचार मांडले. प्राचार्य मधुकर अनाप यांनी "फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारातील वैज्ञानिक दृष्टिकोन" या विषयावर मार्गदर्शन केले. कॉ.कानिफनाथ तांबे यांनी "जाती अंतावरील चिंतन" मांडले.प्रा.डॉ.नवनाथ शिंदे यांनी "फुले-शाहू-आंबेडकर विचारात शेती व शेतकरी विषयक चिंतन" या विषयावर सखोल विवेचन केले. तसेच डॉ. नम्रता काळेबाग यांनी "फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आणि महिला सबलीकरण" या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संतोष उबाळे यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी वातावरण भारावून गेले असून श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरांचे सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये उपस्थितांनी विविध प्रश्न उपस्थित करून चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला.
यानंतर परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ.अनंत केदारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संयोजन संतोष ब्राह्मणे यांनी केले.सूत्रसंचालन संतोष उबाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री.कदम यांनी केले.
