संस्था परिसरात स्वच्छता अभियान राबवून नवा आदर्श
खडकेवाके प्नतिनिधी राहता तालुक्यातील खडकेवाके येथील लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयीन परिसरात नुकतेच स्वच्छता अभियान राबवून "प्लास्टिकमुक्त परिसर" हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि कृषि संचालक डॉ. उत्तम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वच्छता करताना परिसरातील वृक्षसंवर्धनावरही भर दिला.
प्रसंगी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ बाळ जाधव, यांनी विद्यार्थ्यांना परिसर कायमस्वरूपी प्लास्टिकमुक्त ठेवण्याचे आवाहन केले.तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात,असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी आणि ते शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही पुढे असावेत,या उद्देशाने संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतीक्षा क्षीरसागर यांनी केले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ चंद्रकला सोनवणे तसेच नागरी पर्यवेक्षक दीपक गायकवाड, साहिल वाघमारे, मिन्नाथ ढगे, अविनाश मुरादे, सौ.अर्चना गायकवाड, सौ. सुरेखा पोठे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. "माझा परिसर, माझी जबाबदारी" हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.यामुळे महाविद्यालय परिसर अधिक स्वच्छ,सुंदर आणि पर्यावरणपूरक बनला.याचबरोबर त्यांनी फळझाडांना पालापाचोळ्याचे आच्छादन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला.
