लोणी रुपाली भालेराव सध्या उन्हाळ्याचा कडाका प्रचंड वाढला असून सूर्याची प्रखर किरणे अंगाची लाहीलाही करत आहेत.या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांनाच नाही,तर आकाशात मुक्त संचार करणाऱ्या पक्षांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे.वाढत्या उष्णतेमुळे आणि शहरांमधील झाडांच्या कमतरतेमुळे पक्षांना सावली शोधण्यासाठी सर्वत्र भटकावे लागत असल्याचे विदारक चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका छायाचित्रात एक पक्षी भरदुपारी कडक उन्हापासून वाचण्यासाठी एका पथदिव्याचा (स्ट्रीट लाईट) आधार घेताना दिसला. मात्र,झाडांच्या नैसर्गिक सावलीची जागा हे लोखंडी खांब घेऊ शकत नाहीत.उलट, उन्हामुळे हे खांब अधिकच तापत असल्याने पक्षांना तिथेही थंडावा मिळणे कठीण झाले आहे.
दाट झाडी नसल्यामुळे पक्षांना विश्रांतीसाठी जागा उरलेली नाही,परिणामी त्यांना या भीषण उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.वाढत्या उष्म्यामुळे अनेक पक्षी उन्हाच्या झळ्या बसल्याने त्यांना त्रासही जाणवतोय. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे आणि सिमेंटच्या जंगलात मूळची झाडे नष्ट झाल्यामुळे या मुक्या जीवांवर ही वेळ आली आहे.
ही परिस्थिती वेळीच बदलणे गरजेचे असून,त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.निसर्गातील हा अनमोल ठेवा जपण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी झाडे लावली पाहिजेत.जर आज आपण झाडे लावून त्यांचे संवर्धन केले,तरच भविष्यात या पक्षांना हक्काची सावली आणि घरटे बांधण्यासाठी सुरक्षित जागा मिळेल.केवळ मानवाच्या सोयीसाठी निसर्गाचा बळी न देता, या मुक्या पक्षांच्या अस्तित्वाचा विचार करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. हा प्रसंग आपल्या सर्वांना पर्यावरणाप्रती जागृत राहण्याचा संदेश जणू काही देत आहे.
