लोणी रुपाली भालेराव प्रखर उन्हाचा तडाखा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी राहाता लोणी बसस्थानक परिसरातील पानपोई खऱ्या अर्थाने आधारवड ठरली आहे. सामाजिक जाणिवेतून रिक्षा संघटनेच्या सर्व चालकांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही पानपोई सध्या हजारो प्रवाशांची तहान भागवत असून, त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या सर्वत्र कडक उन्हाळा जाणवत असून उन्हाच्या झळांनी नागरिक व्याकुळ झाले आहेत.अशा परिस्थितीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पाण्यासाठी होणारी ओढाताण लक्षात घेऊन लोणी बसस्थानक परिसरातील रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.
बसस्थानक परिसरात ही पानपोई दरवर्षी उन्हाळा सुरू असताना सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते , ती सर्व प्रवाशांसाठी एक मोठी सोय ठरली आहे. विशेषतः लग्नसराईचा काळ आणि शालेय सुट्ट्या असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
या प्रवाशांसोबत लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती मोठ्या संख्येने असतात, अशा सर्वांना या पानपोईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.केवळ पाणी उपलब्ध करून देऊन हे रिक्षा चालक थांबले नाहीत,तर त्यांनी या ठिकाणी स्वच्छतेचे देखील नियम पाळले आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने ही पानपोई अतिशय स्वच्छ ठेवली जाते. सर्व रिक्षा चालक एकत्र येऊन पानपोईच्या जागेची साफसफाई करतात.पाण्याचे रांजण रोज स्वच्छ करून त्यात ताजे आणि शुद्ध पाणी भरले जाते. पाण्याची नासाडी होणार नाही आणि प्रवाशांना थंड व स्वच्छ पाणी मिळेल,याची काळजी स्वतः रिक्षा चालक घेताना दिसतात.
लोणी बसस्थानक परिसरात राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमातून रिक्षा चालकांमधील एकी आणि सामाजिक कार्याप्रती असलेली त्यांची निष्ठा दिसून येते.स्वतःच्या व्यवसायासोबतच समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडत असल्याने,या रिक्षा चालकांच्या कार्याचे दर्शन सर्वत्र घडत आहे प्रवाशांनी देखील या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले असून, रिक्षा संघटनेचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल आहे.
