लोणी रुपाली भालेराव मे महिन्याची सुरुवात होताच निसर्गात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे त्यामुळे लोणी आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या उन्हाचा पारा कमालीचा वाढलेला पाहायला मिळत आहे.कडाक्याच्या उन्हामुळे तापमानाचा पारा चढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची अक्षरशःलाहीलाही होत आहे.
दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत असून, उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.या वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि शरीराला थंडावा मिळवण्यासाठी आता ठिकठिकाणी शीतपेये,पाणी आणि विविध प्रकारच्या कोल्ड्रिंक्सच्या मागणीत मोठी वाढ झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये पाणी थंड ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो,मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा नैसर्गिक पर्याय म्हणून 'मातीच्या माठांना' विशेष पसंती दिली जात आहे.ज्यांना महागडे फ्रीज घेणे शक्य नाही,अशा नागरिकांसाठी 'गरिबांचा फ्रीज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची विक्री सध्या जोरात सुरू आहे.
माठातील पाणी केवळ थंडच नसते,तर ते आरोग्यासाठी देखील अत्यंत गुणकारी मानले जाते,त्यामुळेच ग्रामीण भागासह शहरी भागातही माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे.बाजारपेठेत सध्या विविध आकाराचे, आणि नक्षीकाम केलेले माठ दाखल झाले आहेत.
वाढत्या उन्हामुळे नागरिक नैसर्गिक थंडाव्याकडे वळत असल्याने कुंभार व्यावसायिक आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, माठांच्या मागणी राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोपी,रुमाल आणि छत्रीचा वापर करतानाही मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.
