उन्हाच्या कटाविरुद्ध आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या गुलमोहराने वाढविली रस्त्यांची शोभा

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव सभोवतालच्या निसर्गामध्ये सध्या एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा पाहायला मिळत असते अगदी उन्हाच्या कटाविरुद्ध आपले अस्तित्व सिद्ध करत रस्त्यांची शोभा वाढविणाऱ्या आणि बहरलेल्या गुलमोहरांच्या झाडांकडे आपसुकच लक्ष वेधले जातेय.
ठिकठिकाणी फुललेले गुलमोहर पर्यटकांचे आणि वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहेत.नुकत्याच समोर आलेल्या एका विलोभनीय दृश्यात,स्वच्छ आणि सुंदर डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वृक्षराजीने जणू हिरवा शालू पांघरला असल्याचे जाणवते.

या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर गुलमोहराच्या झाडांवर उमललेली लाल गर्द फुले या संपूर्ण परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. पहाटेच्या संथ प्रकाशात हे दृश्य अधिकच खुलून दिसत असून, निसर्गाचे हे मोहक रूप डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरत आहे.या परिसरात फेरफटका मारताना केवळ झाडांची मांडणीच नव्हे,तर त्यांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेली रंगरंगोटी देखील शिस्तबद्ध असल्याचे दिसून येते.

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या कुंड्यांना पिवळ्या आणि हिरव्या रंगाने सुशोभित करण्यात आले असून,त्यामुळे संपूर्ण मार्गाला एक आधुनिक आणि सुटसुटीत स्वरूप प्राप्त झाले आहे.वरून झुकलेल्या फांद्यांनी रस्त्यावर केलेली सावली आणि त्यातून डोकावणारे आकाश यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला मनःशांतीचा अनुभव येतो.

सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांसाठी निसर्गाचे हे वरदान नक्कीच सुखद धक्का देणारे आहे.
निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण सध्या एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे.झाडांच्या फांद्यांवरून हळूच जमिनीवर पडलेली फुले रस्त्यावर नैसर्गिक गालीचा तयार करत आहेत.

केवळ रस्ता म्हणून न पाहता, निसर्गाचे सौंदर्य आणि मानवी नियोजनाचा हा एक उत्तम संगम असल्याचे येथे स्पष्टपणे जाणवते.प्रदुषणमुक्त वातावरण आणि डोळ्यांना थंडावा देणारी ही हिरवळ जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असा संदेशच जणू हा परिसर आपल्या शांततेतून देत आहे.

सकाळच्या वेळी येथे फिरताना मिळणारा उत्साह आणि निसर्गाचे हे विलोभनीय दर्शन मानवी मनाला उभारी देणारे ठरत आहे.शेवटी निसर्गाचे सौंदर्य पाहण्याचा दृष्टिकोन मात्र आपल्याकडे असायला हवा आहे.रस्त्याच्या दुतर्फा असलेले फुलांनी बहरलेली ही वृक्ष जणू काही आपल्या अस्तित्वाची साक्ष उभी आहेत असे जाणवते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!