दहावीचा निकाल आणि मराठी भाषेपुढील आव्हाने

Cityline Media
0
९४ हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास; अभिजात भाषेला हादरा

नुकताच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सर्वत्र यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या निकालामध्ये सर्वच विभागांत मुलींनी बाजी मारलेली दिसून येते,जे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. मात्र,या आनंदाच्या वातावरणासोबतच एक गंभीर वास्तव समोर आले आहे, ते म्हणजे यावर्षी तब्बल ९४ हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असतानाच शालेय पातळीवर मात्र या भाषेबद्दल कमालीची अनास्था दिसून येत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.  
मराठी विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्यामागे अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कारणे आहेत. विशेषतः मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी किंवा इतर परकीय भाषांकडे अधिक असल्याचे जाणवते.

यामुळे मराठीला प्रथम भाषा म्हणून घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नापास होण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच मराठी विषयाचा नवीन कृतीपत्रिका आराखडा समजून घेण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. वाचनाचा अभाव आणि लेखन सरावाची कमतरता यामुळे शुद्धलेखनात होणाऱ्या चुका विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम करत आहेत.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी पालकांनी आणि शिक्षण क्षेत्राने एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे. मुलांमध्ये मराठी विषयाची आवड निर्माण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.आपली मायबोली समृद्ध करण्यासाठी लहानपणापासूनच मुलांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी निर्माण केली पाहिजे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि या फावल्या वेळेचा सदुपयोग वाचनासाठी करता येईल.खेळांसोबतच मुलांनी दररोज मराठी वृत्तपत्रे वाचली, तर त्यांना वाचनाचा संदर्भ आणि सभोवतालच्या घडामोडींची अचूक माहिती मिळेल.वाचन संस्कृती जोपासल्यामुळे मुलांमध्ये शब्दांचा साठा वाढेल आणि त्यांची भाषा अधिक प्रगल्भ होईल.

केवळ परीक्षेपुरते मराठी न शिकता ती एक समृद्ध जीवनशैली म्हणून अंगीकारणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना मराठी साहित्याशी जोडण्यासाठी पुढाकार घेतला, तर निश्चितच मराठी विषयातील निकालाचे हे चित्र भविष्यात बदलू शकेल.आपली भाषा टिकवणे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत सक्षमपणे पोहोचवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

आपल्या सभोवताली परिसरामध्ये बरीचशी साहित्य संमेलने किंवा पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम देखील आयोजित केले जातात या कार्यक्रमांना आपल्या मुलांना  आवर्जून घेऊन जावे. मराठी भाषा फक्त गुण मिळावेत याकरिता अभ्यासावी असे नाही. तर मराठीचा संस्कृती पुढे जपता यावी यासाठी मराठी भाषा ही प्रत्येकाला यायलाच हवी. शेवटी म्हणतात ना,बोलावे मराठी,ऐकावी मराठी ,आणि जपावी मराठी!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!