लोणी रुपाली भालेराव सध्याच्या अत्यंत वेगवान, धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात मुलांचे भावविश्व कमालीचे बदलून गेले आहे.आजच्या मुलांचे वेळापत्रक शाळा, शिकवणी वर्ग,विविध क्लासेस आणि स्पर्धा परीक्षांनी पूर्णपणे खचाखच भरलेले दिसते. या सगळ्या धावपळीत मुलांचे बालपण, घरातील मोकळीक, हसणे, गप्पा आणि साधे आनंदाचे क्षण कुठेतरी हरवून चालले आहेत. अशा संवेदनशील आणि गंभीर परिस्थितीत पालकांनी थोडे थांबून, आपल्या पाल्यांचे म्हणणे मनापासून ऐकून घेण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे, आजच्या पालकत्वापुढील आव्हाने आणि या आम्हाला पुढचा मार्ग हा प्रत्येक पालकाला शोधता आलाच पाहिजे आला आहे.निसर्गाने प्रत्येक मुलामध्ये एक खास आणि वेगळा गुण दडलेला ठेवलेला असतो. पालकांनी केवळ तो गुण ओळखण्याची आणि त्याला योग्य पद्धतीने वाढवण्याची खरी गरज असते. जेव्हा आपण मुलांना त्यांच्या स्वतःच्या गतीने वाढू देतो, त्यांना मनापासून समजून घेतो आणि त्यांच्या लहान-सहान प्रयत्नांचे कौतुक करतो, तेव्हा ती मुले एखाद्या सुंदर फुलासारखी उमलतात. परंतु, आजच्या काळात पालकांकडून मुलांची सतत इतरांशी तुलना केली जाते.
जी मुलांच्या मानसिकतेसाठी अत्यंत घातक ठरते. सततच्या या तुलनेमुळे ते फूल उमलण्यापूर्वीच कोमेजून जाते. याउलट, जेव्हा आपण आपल्या पाल्यांवर पूर्ण विश्वास दाखवतो, तेव्हा ती मुले स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
आजच्या पिढीतील मुलांचे जीवन आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचे आणि मानसिक दडपणाचे झाले आहे. एका बाजूला पालकांकडून असणारे अभ्यासाचे ओझे, दुसरीकडे समाजात पावलोपावली जाणवणारी स्पर्धा आणि त्यातच स्वतःची स्वतंत्र ओळख शोधण्याची लहान वयातील धडपड, या सगळ्या गर्दीत मुलांचे निरागस हास्य हरवत चालले आहे.
मुले त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना अनुभवत असतात. अनेकदा त्यांच्या मनातील भावना इतक्या गुंतागुंतीच्या असतात की, त्या शब्दांत मांडणेही त्यांना जमत नाही. अशा वेळी नकळत ती मुले एकटी पडतात, कोणालाही काही न सांगता आतून पूर्णपणे तुटत राहतात.
पालकांचे मुलांच्या या शांततेकडे दुर्लक्ष होते आणि ते केवळ वरवरची शांतता पाहून सर्व काही ठीक आहे असे समजून पुढे निघून जातात, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. म्हणूनच आज पालकांनी केवळ हुकूम सोडणारे 'पालक' न राहता मुलांचे खरे मित्र होणे गरजेचे आहे. मुलांच्या डोळ्यांमागे दडलेले अश्रू ओळखणे, त्यांचे न बोललेले शब्द शांतपणे ऐकणे आणि त्यांच्या मनाला समजून घेणे हीच आजची खरी कौटुंबिक जबाबदारी बनली आहे.
आजकालच्या मुलांना त्यांच्या विकासासाठी विशिष्ट स्वातंत्र्य हवे असते, मात्र त्याच वेळी त्यांच्यासाठी योग्य मर्यादा निश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे असते. स्वातंत्र्य आणि मर्यादा यात योग्य संतुलन साधणे पालकांसाठी नक्कीच सोपे नाही, पण ते अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक मूल हे संपूर्णपणे वेगळे असते, त्याचे स्वभाववैशिष्ट्य, विचार करण्याची पद्धत, शिकण्याची गती आणि स्वप्ने वेगळी असतात.
पालकांनी सर्वप्रथम आपले मूल जसे आहे, तसा त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याला इतरांसारखे बनवण्याचा अट्टाहास टाळला पाहिजे. 'तो बघ किती चांगले मार्क्स आणतो' किंवा 'तिला बघ किती छान गाता येते' अशा प्रकारच्या विधानांमुळे मुलांच्या मनावर नकळतपणे प्रचंड दडपण निर्माण होते.
ही तुलना मुलांना कधीच पुढे जाण्याची प्रेरणा देत नाही, तर उलट त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे कमी करते. यामुळे मुले स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागतात आणि 'मी आयुष्यात काहीच करू शकत नाही' असा नकारात्मक विचार त्यांच्या मनात घर करू लागतो. मुलांना तुमच्याकडून कोणत्याही स्पर्धेची अपेक्षा नसते, तर त्यांना केवळ तुमच्याकडून समजून घेण्याची आणि प्रेमाची अपेक्षा असते.
सध्याच्या काळात मुलांमध्ये तणाव आणि चिंतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक पालक मुलांच्या या वाढत्या मानसिक समस्यांकडे सर्रास दुर्लक्ष करतात, जे पुढे जाऊन मुलांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. मुलांशी त्यांच्या मनात चाललेल्या वादळाबद्दल, अडचणींबद्दल थेट बोलणे आणि गरज पडल्यास त्यांना योग्य मदत करणे आवश्यक आहे.
आज संयुक्त कुटुंब असो वा लहान कुटुंब,जर घरात सुसंवाद असेल, आपुलकीची ऊब असेल आणि एकमेकांसाठी वेळ असेल, तर ते घर मुलांसाठी सर्वात सुरक्षित आणि आनंदी ठिकाण ठरते. मुलांना महागड्या वस्तू किंवा सल्ल्यांपेक्षा पालकांचा वेळ आणि प्रेमाची खात्री हवी असते.
रोजच्या व्यस्त दिनचर्येतून केवळ दहा मिनिटे मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवून, मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी संवाद साधला, तर तो क्षण मुलांसाठी अमूल्य ठरतो. आपण एक 'परफेक्ट' पालक होण्याचा अवाजवी प्रयत्न करण्यापेक्षा, मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित राहणे अधिक महत्त्वाचे आहे.
वेळ जरी कमी असला, तरी नात्यातील जिव्हाळा आणि संवाद कधीच कमी होऊ देऊ नका, असा अत्यंत मोलाचा आणि डोळे उघडणारा आपल्या मुलांच्या बाबतीतला संदेश यातून मिळत आहे. हे पालकांचं अस्तित्व आणि संस्काराचं अभिरूप असतं. मग याला जपायला नको का !
