सात्रळ मध्ये क्रिकेटचा महासंग्राम

Cityline Media
0
आमदार अक्षय कर्डिले चषकासाठी २४ संघ सज्ज

सोनगाव शहाजी दिघे:राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व आणि नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांची राहुरीचे नुतन आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या “अक्षय कर्डिले आमदार चषक” क्रिकेट स्पर्धेने सात्रळ परिसरात अक्षरशः क्रिकेटचा जल्लोष निर्माण केला आहे.राहुरी तालुक्यातील सात्रळ-तांभेरे रस्त्यावरील म्हसोबा माळ मैदानावर सुरू असलेल्या या भव्य प्लास्टिक बॉल डे-लीग क्रिकेट स्पर्धेकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून युवकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.
दि. ३० मेपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत केवळ प्रथम येणाऱ्या २४ संघांनाच प्रवेश देण्यात आल्याने संघांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळावे,युवकांमध्ये क्रीडाभाव वाढावा आणि गावा गावातील प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अवघ्या पाच षटकांच्या जलदगती सामन्यांमुळे प्रत्येक चेंडूवर थरार अनुभवायला मिळणार असून चौकार-षटकारांच्या आतषबाजीने म्हसोबा माळ मैदान दणाणून जाणार आहे.

क्रिकेट प्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून गावागावातून प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानावर दाखल होत आहेत.विशेष म्हणजे डे-लीग स्वरूपातील सर्व सामने थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात येणार असल्याने क्रिकेट प्रेमींना घरबसल्या देखील सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा आता संपूर्ण राहुरी तालुक्यासह परिसरात रंगू लागली आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी ७ हजार   रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नामांकित संघांनी विजयासाठी कंबर कसली आहे.

शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट मैदान व्यवस्था आणि दर्जेदार आयोजनामुळे या स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.या स्पर्धेचे आयोजन रमेश पडघडमल,तुषार लकारे,किरण उचाडे, नवनाथ मेहरे, योगेश तुंबारे यांनी केले आहे. तसेच भाऊसाहेब पगारे मित्रमंडळ, राजन ब्राम्हणे मित्रमंडळ, सरपंच सतीश ताठे, रमेश पन्हाळे, विश्वास कडू, राजू पाटील चोरमुंगे, योगेश चोरमुंगे, योगेश गीते, विजय कानडे, राजन ब्राह्मणे, शुभम नालकर, निखिल डुक्रे, अमोल विधाते, ज्ञानदेव डुक्रे आणि अविनाश माघाडे यांच्यासह सात्रळ, सोनगाव व धानोरे परिसरातील युवक आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभत आहे.

ग्रामीण भागातील तरुणाईला एकत्र आणत क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणारी ही स्पर्धा सध्या सात्रळ परिसराचे मुख्य आकर्षण ठरत असून पुढील काही दिवस म्हसोबा माळ मैदानावर क्रिकेटचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!