जास्मिन विजय काकडे यांचा पुण्यात ११ मे ला प्रथम व्रत स्विकार विधी

Cityline Media
0
चिखलातून उमलले कमळ.

आजच्या धकाधकीच्या यंत्रयुगात सर्वच आपापल्या जीवनात व्यग्र आहेत.आपले घर,आपले कुटुंब,आपले आप्तस्वकीय आणि मित्रमंडळी या विश्वात जो तो दंग असताना, या वासनांध जगात जीवन जगत असताना ईश्वरी हाक आणि आत्मिक आवाज मात्र त्याला ऐकू येत नाही.होय.!प्रभू आपल्याशी निरंतर बोलण्याचा प्रयत्न करतो आहे,त्याचे प्रेम,तळमळ आपल्याला दिसत नाही कारण आपण आपल्या विश्वात पूर्णपणे व्यग्र झालेलो आहोत, पण ही हाक ऐकणारं देवाचे अधिष्ठान मिळालेलं एक कुटुंब म्हणजे सेक्रेट हार्ट चर्च, सोनगाव कॅथोलिक धर्मग्राम अंतर्गत आणि नगर मनमाड महामार्ग लगत असलेले चिंचोली फाटा येथील विजय मार्कस काकडे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ.मनीषा विजय काकडे यांना दोन अपत्य मुलगी जास्मिन आणि मुलगा अनोश, जास्मिन आणि अनोश हे दोघंही सेमिनरीमध्ये दाखल झालेले आहेत.

जास्मिनचा जन्म ०१ मे २००६ साली सेंटअँन्स् हॉस्पिटल,घोडेगाव, ता. नेवासा या ठिकाणी झाला. देवाची हाक त्यांच्या कानी आली आणि त्यांनी होकार दिला.जणू काय चिखलातून कमळ उमलले असंच म्हणावं अगदी तसे काकडे,कुटुंबीय पुण्यात कासारवाडी या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाले होते.

सर्वकाही आनंदात असताना त्यांना जास्मिन आणि अनोश यांचा जन्म झाला. विजय आणि मनीषा यांचा संसार फलद्रूप झाला.आजोबा मार्कस केरू काकडे आणि आजी विमल यांना आकाश ठेंगणे वाटू लागले.त्यांचे आपल्या नातवांबरोबर खेळताना दिवस मजेत जाऊ लागले.

सुखांच्या हिंदोळ्यात रमून गेले. पुण्यातील नामांकित इंग्रजी शाळेत दोघांनीही प्रवेश मिळाला,आजोबा आपल्या नातवांना शाळेत घेऊन जाऊ लागले, सर्व काही मजेत चालले होते. चांगले बस्तान बसलेले असताना काही कारणास्तव पुणे सोडावं लागलं.सर्वच हतबल झाले.जास्मिन, आता पुढच्या वर्गात गेली होती.

अनोश,देखील त्याच मार्गावर होता. सर्व कुटुंबाचा लवाजामा चिंचोली फाटा,येथे दाखल झाले.आतापर्यंत शहरातील वास्तव्य पण खेड्यात इंग्रजी शाळा कुठून असणार ? लोणी प्रवरा या ठिकाणी इंग्रजी शाळा होती परंतु येणे जाणे परिस्थितीला परवडणारे नव्हते.पण विजय आणि मनीषा डगमगले नाहीत त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता.

त्याची योजना आपल्याला कळणार नाही पण जे काही पुढे होईल ते त्यांच्यावरील विश्वासानेच! हा भरोसा दोघांचाही होता.देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता या पेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. देवाची हीच परीक्षा समजून दोघेही पूर्ण विश्वास आणि प्रार्थना करू लागले.

कुटुंबात रोजची प्रार्थना सुरू झाली. आपण किती खरे किंवा खोटे आहोत हे देवाला आणि स्वतःलाच माहीत असते.या उभयतांनी आपले सर्वस्व देवाचरणी वाहिले.मुलांच्या मनात भक्तीभाव वाढला चांगले संस्कार होऊ लागले. सोन्याला अग्नीच्या भट्टीत जाळल्यावरच त्याची शुद्धता कळते.

जी चकाकी सोन्याची झळाली दर्शविते.तद्वतच काकडे कुटुंबीय ताऊन सुलाखून निघू लागले. दुःखाचे अनेक संकटे पार करीत असले तरी यातून बाहेर पडण्याचा दरवाजाही देवाने दाखविला आहे.जास्मिनला इंग्रजी शाळा मिळाली नाही पण सेमी इंग्रजी शाळेत प्रवेश मिळाला.

या शाळेतील एक शिक्षक देवदूत रूपाने तिला भेटले. त्यांचे नाव श्री.नानोर, याशिक्षकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन तिला फारच उपयुक्त ठरले.त्यांची शिकविण्याची पद्धत आणि अवघड प्रश्नांची उकल ते अत्यंत सहजतेने करीत त्यामुळे कुठलेही अवघड विषय वाटलेच नाहीत याचाच परिणाम दहावीच्या परीक्षेत ७४% टक्के मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादित केले‌.

जास्मिनला पवित्र मरीयाबद्दल फारच लळा होता. पवित्र माळ सतत तिच्या हातात असे. ज्यावेळी अकरावीला कॉलेज प्रवेश घेतला त्यावेळी फातिमा कॉन्व्हेंटच्या सि. अर्चना लोहाळे,यांच्याशी संपर्क आला. त्या संपर्कातूनच जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. सिस्टर आणि आपल्या आपुलकी आणि ओजस्वी मधुर वाणीने जास्मिन, भारावून गेली.

आपणही सेमिनरी मध्ये जाऊन ईश्वराच्या सानिध्यात गरिबांची सेवा का करू नये? असे अनेक विचार तिच्या मनात घोळू लागले. मनाची अस्वस्थता तिला स्वस्त बसू देईना. मनात चलबिचल, प्रार्थना मध्ये तिला शांतता लाभू लागली. आपल्याला प्रभू बोलावीत आहे,असे तिला जाणवू लागले. देवाची ओढ तिला अस्वस्थ करू लागली.

त्याचे फळ म्हणजे जास्मिन, सिस्टर होण्याकरिता सेमिनरीत दाखल झाली.पुणे कॅथोलिक धर्माप्रांताचे वंदनीय बिशप. सायमन अल्मेडा,  यांच्या पावन हस्ते, सोमवार ता. ११ मे २०२६ रोजी प्रथम व्रत स्विकार विधी फातिमा नगर पुणे येथील फातिमा कॉन्व्हेंट येथे पार पडणार आहे.

आणि १७ मे, रोजी आभाराची प्रार्थना चिंचोली फाटा येथील निवासस्थानी सकाळी १०:०० वाजता होणार आहे हे सर्व काही होत असताना जास्मिनचा लहान भाऊ अनोश, हा काही स्वस्थ बसून नव्हता. घरातील प्रार्थना, आई वडिलांचे संस्कार,या संसारी जगात मन रमेना आणि तो सुद्धा सेमिनरीमध्ये दाखल झाला.

अनोश,आता एस.व्ही.डी संस्थेत वसई, येथे शिक्षणासाठी पुढील तयारी करीत आहे.आजोबा मार्कस केरू काकडे, हे भजन मंडळात अतिशय प्रवीण होते.आजोबा मार्कस काकडे,आजी विमल काकडे, यांची जास्मिन ही नात; तर अनोश हा नातू आहे.

विजय मार्कस काकडे, यांचे सख्खे मोठे मामा स्व. कारभारी जनार्दन तांबे,यांच्या दोन कन्या जयश्री व राजश्री सिस्टर म्हणून प्रभूच्या मळ्यात कार्यरत आहेत.देवाचा आशीर्वाद या कुटुंबावर भरभरून आहे. त्यांचा त्याग ईश्वराच्या हाकेला दिलेला होकार आणि समाजासाठी ईश्वर चरणी वाहून घेण्याची त्यांची मानसिक तयारी या माता पित्यांना ईश्वर आशीर्वादित करो.

दुसऱ्यांसाठी कसे जगायचे ते मुलाने बापाकडे पाहून शिकावे, प्रत्येक नवा दिवस उजाडतांना आई-बापांना स्मरून देवाला हात जोडावे. जन्मदात्या बापाचे काळीज अन् आईची माया ईश्वराच्या हाकेने पूर्णत्वाकडे झेपावते. धन्यता मानावी देवाला ही संधी त्यांच्यामुळेच आमचे आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले. ही हाक प्रत्येकाला असते पण बोलाविलेले पुष्कळ आहेत; पण निवडलेले फार थोडे आहेत. चिखलातून उमललेले हे कमळ आता प्रभूच्या मळ्यात आपला सुगंध पसरविणार आहे. धन्यवाद!

शिवा तांबे
वडगाव शेरी पुणे १४
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!