आई एक अलौकिक वास्तव देणगी

Cityline Media
0
जिथे देव नसतो तिथे आई असते,आईपण हे खरोखरच ईश्वराने मानवाला दिलेली एक अलौकिक देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनातील आठवणींच्या एका खास संग्रहालयात आईचे स्थान हे सर्वोच्च असते.ती केवळ एक नाते नसून आयुष्याच्या कोऱ्या कॅनव्हासवर मायेचे आणि आधाराचे रंग भरणारी एक सुंदर आकृती आहे.आपल्या जीवनात उत्तम संस्कारांची पेरणी करणारी आणि अज्ञाताचे अस्तित्व सिद्ध करणारी ती एक अदृश्य पण तितकीच प्रबळ शक्ती आहे.आईचे प्रेम हे आयुष्यातील पहिले आणि सर्वात जिव्हाळ्याचे दालन असते. या दालनात आपण एखाद्या नवख्या पर्यटकाप्रमाणे वारंवार जातो आणि तिथल्या जुन्या,गोड आठवणींचा आस्वाद घेत राहतो.
आजच्या डिजिटल युगात आपण अनेक गोष्टी 'स्टोरेज स्पेस' मध्ये साठवतो किंवा त्यांचा 'कॉम्प्युटराईज्ड' बॅकअप घेतो,पण आईच्या आठवणी या तंत्रज्ञानाच्या पलीकडच्या आहेत. या आठवणी आपण आपल्या सोयीनुसार हव्या तेव्हा निर्माण करू शकत नाही किंवा त्या कायमच्या 'डिलीट' ही करू शकत नाही आणि हीच मानवी आयुष्यातील सर्वात मोठी गंमत आहे. जगात प्रत्येक वस्तूची किंमत असते आणि ती पैशाच्या स्वरूपात मोजली जाऊ शकते, मग ती शारीरिक असो, मानसिक असो वा भावनिक. परंतु आईपणाची किंमत कोणत्याही चलनात किंवा मोजमापात मोजणे अशक्य आहे.
स्त्रीचे अस्तित्व आणि तिचे संपूर्ण कर्तृत्व हे तिच्या मुलांच्या हितासाठी समर्पित असते. प्रसंगी ती विद्येची देवता 'सरस्वती' होऊन आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवते, तर कधी संकटाच्या वेळी कुटुंबाच्या रक्षणासाठी 'चंडिकेचे' रौद्र रूपही धारण करते. आई ही मुलांसाठी जगातील पहिली गुरु असते, मात्र या गुरूकडे शिक्षेची छडी नसते, तर फक्त मायेची ऊब आणि संस्कारांची शिदोरी असते. आईच्या या निस्वार्थ आणि त्यागी वृत्तीमुळेच तिला देवासमान मानले जाते. मनाच्या म्युझियममध्ये असणारी ती आयुष्याच्या चित्रकलेत रंग भरणारी आकृती आहे, ती संस्कारांची पेरणी करणारी आहे आणि अस्तित्व सिद्ध करणारी सिद्धता आहे.आईचे प्रेम हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातले सर्वात सुंदर आणि लाडके दालन असते,जिथे आपण पुन्हा पुन्हा जाऊन त्या आठवणींचा आनंद घेत असतो. आई ही मुलांसाठी पहिला गुरु असली  तरीही वडिलांशिवाय या गुरुचा फळा रिकामा आहे  हेही तितकेच खरे!

लेखिका रूपाली निलेश भालेराव
लोणी ता राहाता 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!