आगार प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि भोगळा कारभार चव्हाट्यावर!
संगमनेर अजय नान्नोर/प्रबोधन टेकाळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या निष्काळजी आणि ढिसाळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसल्याची घटना समोर आले आहे.नुकतेच नाशिक–पुणे महामार्गावरील अमृतवाहिनी महाविद्यालय कॅम्पसजवळ भर दुपारी महामंडळाची बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.कडक उन्हाच्या झळा सहन करत महिलांपासून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांसह अनेक प्रवाशांना तासनतास रस्त्याच्या कडेला येणाऱ्या बसची वाट पाहत उभे राहावे लागले.भर उन्हात बस बंद पडल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.अनेक प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?”, “देखभाल न केलेल्या बस रस्त्यावर का? सोडल्या जातात?” असा संतप्त सवाल उपस्थित केला.
महामार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.विशेष म्हणजे, नाशिक–पुणे महामार्ग हा कायम वर्दळीचा मार्ग मानला जातो.अशा महत्त्वाच्या मार्गावर बस बंद पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.आगार प्रशासनाकडून पर्यायी बस उशिरा पोहोचल्याने प्रवाशांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागला.
या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बस प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि बसच्या नियमित देखभालीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
महामार्गावरील वाहतुकीच्या गोंधळात प्रवाशांना सुरक्षिततेचाही धोका निर्माण झाला.वारंवार अशा घटना घडत असतानाही आगार प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोण घेणार,असा प्रश्न आता यावेळी उपस्थित होत आहे.
