आईच्या समय सूचकतेमुळे वाचला मुलाचा जीव

Cityline Media
0
घरात शिरलेला बिबट्या जेरबंद

झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खरशिंदे गावात नुकतेच एका बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली.मात्र, वाडेकरांच्या दगडी वाड्यातील घरामध्ये बिबट्या शिरलेला असताना एका ६५ वर्षीय मातेने दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे आणि समयसूचकतेमुळे तिच्या मुलाचा जीव थोडक्यात वाचला आहे. वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, खरशिंदे गावातील हरिभाऊ शिवराम गायकवाड यांच्या घरात सकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक प्रवेश केला.त्यावेळी हरिभाऊंची आई गंगुबाई (वय ६५) या दरवाजाजवळ असलेल्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या. त्याच वेळी दोन फुटाच्या अंतरावरुन बिबट्या अचानक घरात शिरला.बिबट्या घरात शिरला त्यावेळी हरिभाऊ गायकवाड हे दरवाजाच्या अगदी शेजारीच झोपलेले होते. समोर साक्षात काळ उभा असल्याचे पाहूनही गंगुबाई डगमगल्या नाहीत.

क्षणाचाही विलंब न लावता गंगुबाई यांनी आरडाओरडा करत मुलगा हरिभाऊ याला बिछान्यासकट बाहेर ओढले आणि अत्यंत शिताफीने घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून घेतली.आईच्या या समय सूचकतेमुळे बिबट्या घरातच कैद झाला आणि पुढील मोठा अनर्थ टळला.

या घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे ,वन मंडल अधिकारी भाऊसाहेब बोकडे ,वनरक्षक रामेश्वर मडपे , बचाव पथक प्रमुख संतोष पारखे ,वनरक्षक पवार , धानापुणे ,साळवे ,कर्मचारी पोपट गागरे ,नजीर शेख ,उत्तम भूसारी ,गोविंद भूसारी ,संजय गागरे ,रामदास वर्पे यांनी पथकासह तातडीने गायकवाड यांच्या घरी धाव घेतली.बिबट्या घरात लपून बसलेला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला मोठ्या कसरती कराव्या लागल्या. बिबट्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला.या दरम्यान बिबट्या घरामध्ये इकडून तिकडे उड्या मारत लपंडाव खेळत होता.अखेर इंजेक्शनचा प्रभाव पडल्यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.

हा थरार सुरू असताना गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी वनविभागाला मोलाची मदत केली. यामध्ये संजय गायकवाड, निलेश वाडेकर,मोशीन शेख, रामनाथ वाडेकर, शिवा पंडित, जब्बर शेख, दत्ता पवार, दीपक कोळशे, शाहरुख सय्यद, लहानु पंडित, संजय पंडित, गोरख जगधने, पिर मोहम्मद शेख, संजय भुसारी, मोसिन शेख आणि सोनू पंडित या सर्वांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात सहकार्य केले.

बिबट्या जेरबंद झाल्याने खरशिंदे गावासह पठार भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने गस्त वाढवावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!