संगमनेर प्नतिनिधी शहरातील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विशेष राष्ट्रीय सेवा योजना आरोग्य व समाजसेवा अभियान २०२६-२७ हे शिबिर तालुक्यातील मालदाड गाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
युथ फॉर स्मार्ट हेल्थ इंडिया २.” तसेच “युथ फॉर for रुरल ट्रान्सफॉमिशन इंडिया या संकल्पनांवर आधारित या सात दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांनी ग्रामविकास,स्वच्छता,आरोग्य जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
दि. २० एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवक यांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिबिर दरम्यान स्वच्छ भारत अभियान, वृक्षारोपण, रक्तगट तपासणी शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य तपासणी, महिलांसाठी जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन,जलसंवर्धन, व्यक्तिमत्व विकास,ग्रामीण स्वच्छता अभियान, शालेय विद्यार्थ्यांचे बीएमआय मापन, तसेच उद्यान व कृषी क्षेत्र भेट अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
शिबिरामध्ये विविध मान्यवरांची प्रेरणादायी व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली. यामध्ये बाबा खरात यांनी “ग्रामीण विकासात युवकांचे स्थान” या विषयावर मार्गदर्शन करत ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी युवकांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारून पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तसेच मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष सीपीआर ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये डॉ. संतोष गोडसे यांनी आपत्कालीन परिस्थितीत सीपीआर चे महत्त्व आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. यासोबतच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदाब, रक्त तपासणी, ईसीजी तसेच विविध शारीरिक तपासण्या करण्यात आल्या.याशिवाय ग्राम रुग्णालयाच्या वतीने एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सौ.गायकवाड यांनी एड्स या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी मोफत एड्स तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी आयोजित व्याख्याने आणि जनजागृती मोहिमा यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वयंसेवकांनी श्रमदान करून गाव परिसर स्वच्छ केला तसेच सामाजिक ऐक्य आणि सेवा भावनेचा आदर्श निर्माण केला.
या शिबिरासाठी मालदाड गावचे सरपंच गोरख नवले,उपसरपंच. गणेश भालेराव तसेच ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर उपरे यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.
या शिबिराचे मार्गदर्शन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे पदाधिकारी तसेच डॉ. एम.पी.शिरभाते यांनी केले. तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. नान्नर ए. आर., डॉ. जगनर ए. बी., प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी “नोट मी बट यु या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे निस्वार्थ सेवा देत ग्रामविकासासाठी योगदान दिले.
