आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे पहिले राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुण्यात
पुणे दिनेश गायकवाड आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ” यांचे पहिले राज्यस्तरीय स्नेह संमेलन पुण्यातील निळू फुले सभागृह, दांडेकर पूल येथे उत्साहात पार पडले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या संमेलनात सहभागी झाले होते.विशेषतःमहिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन आणि महाराष्ट्र राज्यगीताने झाली. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते वसंत साळवे,ज्येष्ठ विद्रोही कवी बबन सरवदे, महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे, समाजकल्याणचे उपआयुक्त विशाल लोंढे, ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध वक्ते जगदीश ओहोळ ,कवी व निर्माते तरी आम्ही बोलू नये चे आकाश अप्पा सोनावणे
कवितेचा नवा आवाज सुमित गुणवंत व हृदय मानव अशोक तसेच सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कांबळे उपस्थित होते.
या वेळी सुभाष वारे म्हणाले की, “आम्ही अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अवघ्या चार-पाच महिन्यांत सोशल मीडियाच्या माध्यमातून उभी राहिलेली आणि राज्यस्तरीय संमेलनासह अहवाल वाचन करणारी ‘आम्ही भारताचे लोक’ ही एकमेव संघटना आहे.”
विठ्ठल गायकवाड यांनी चळवळ यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. विशाल लोंढे आणि जगदीश ओहोळ यांनी आपल्या मनोगतातून चळवळीला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
संमेलनाचे कार्याध्यक्ष अॅड. नितीन घोडके यांनी “आम्ही भारताचे लोक” ही कोणत्याही एका जातीची संघटना नसून आंबेडकरांच्या नावावरून चळवळ व कार्यकर्त्यांना जातीत अडकवणे थांबवावे, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे नसून देशाचे आणि जगाचे प्रेरणास्थान आहेत.”
संमेलनाचे अध्यक्ष व चळवळीचे मुख्य समन्वयक संदेश कर्डक यांनी आपल्या भाषणात भावुक होत, सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेल्या बांधवांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आज आपण नवीन असलो तरी भविष्यात या चळवळीचा ठसा इतका प्रभावी असेल की, विद्यमान व्यवस्थेलाही या चळवळीला सोबत घेऊनच पुढे जावे लागेल,” असे त्यांनी नमूद केले. “चला माणूस जोडू या” या मानव साखळीच्या माध्यमातून समाज व देशाच्या उन्नतीसाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संमेलनात “उठाव साहित्य मंच” व “तरी आम्ही बोलू नये” यांच्या काव्य मैफिलींनी विशेष रंगत आणली. तसेच गायन, प्रतिनिधी मनोगत,आरोग्य व आर्थिक नियोजन यावर मार्गदर्शनपर सत्रेही आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिता रामटेके, डॉ. शुभा लोंढे, शुद्धोधन गवई आणि संघशिल भद्रे यांनी केले.
राज्य प्रतिनिधी डॉ.अविनाश मनवर यांनी सर्वांचे स्वागत केले.आभार प्रदर्शन अॅड.नितीन घोडके यांनी केले.
या संमेलनाचे यशस्वी आयोजन पुणे पथक तसेच राज्य प्रतिनिधींनी केले.
