शब्दांतून उमटे लेखणीची व्यथा,
अनंत काळाची ही शब्दांचीच कथा,
शब्दांविना शब्द असावे मुलाधार,
अस्तित्वाचा शोध घेई हा शब्दांचाच सार.
लिहावे शब्द विचारांच्या स्वरूपी,
कधी मायेची सावली, कधी धार तलवारीची रुपी,
जसा असेल भाव, तशी वाक्याची ही धार,
शब्दांच्याच जोरावर झुकते हे विश्व सारं.
बोलावे शब्द नेहमी कोमल फुलांपरी,
रुजावा सुगंध त्याचा प्रत्येकाच्या अंतरी,
कधी आधार, कधी प्रेरणा स्वरूप व्हावे,
कोमेजल्या मनाला शब्दांनीच सावरत जावे.
पण शब्द कधी असावे अस्सल अपमानाचे,
धारदार शस्त्रासारखे, अन आत्मदहनाचे,
एका चुकीच्या शब्दाने होते राखरांगोळी,
शब्दांतूनच सुटते मग संतापाची गोळी.
शब्दांविना न काही वदावे या जगी,
संवादाची ही ज्योत शब्दांनीच जागी,
शब्दांशिवाय हा संवादही अपुरा वाटे,
शब्दांनीच विरघळतात संघर्षाचे काटे.
शब्दांनीच जुळतात रेशमी मनांची मने,
शब्दांनीच विणली जातात प्रेमाची गाणी,
पण जेव्हा शब्दांत येतो अहंकाराचा कडूवा,
तेव्हा याच शब्दांनी येतो आयुष्यात दुरावा.
न जाणे कोणास ही शब्दांची अनाकलनीय भाषा,
कधी निराशेचा अंधार, कधी उमेदीची आशा,
ज्याला शब्दांचे हे मर्म एकदा उमजले,
त्याला जगण्याचे गुपित पूर्णपणे समजले.
कितीही प्रयत्न केला तरी तो राहतो अनभिज्ञ,
माणसाला ओळखण्यात शब्दच ठरतात विज्ञ,
शब्दांच्या या अथांग सागरात जो स्वतःला हरवतो,
तोच खऱ्या अर्थाने शब्दांची ही कथा अजरामर करतो.
लेखिका रूपाली निलेश भालेराव
लोणी बुद्रुक
