पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांची भेट घेऊन निवेदन देणार
हनुमंतगाव प्नतिनिधी राहता तालुक्यातील हनुमंतगाव येथे रेशनचा खूप मोठा घोटाळा झाला असून गोरगरिबांचे रेशनचे धान्य हडप केल्याचा प्रकार गावकऱ्यांनी उघडकीस आणला असुन जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी या घोटाळ्याची चौकशी करून घोटाळेखोरांवर कारवाई करा अन्यथा तहसील समोर तीव्र निदर्शने केली जातील असा खणखणीत इशारा दिला आहे.
श्री.अहिरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहता तालुक्यातील हनुमंतगाव येथे गरिबांच्या रेशनच्या धान्यावर डल्ला मारण्यात आला आहे.व खूप मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य हडप करण्यात आले आहे.
केवळ बिलांच्या पावत्या काढून धान्य दिल्याचा बनाव केला गेला.चार ते पाच महिन्यांच्या पावत्या अद्यापही हनुमंतगावातील नागरिकांकडे शिल्लक आहेत परंतु त्यांना अद्याप रेशनचे धान्य मिळालेले नाही.त्यामुळे गावात प्रचंड रोष निर्माण झाला असून हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबाचे रेशनचे धान्य न मिळाल्याने खूप हाल होत आहेत.
रेशन दुकानासमोर लोकांची रोज गर्दी होत आहे परंतु त्यांना धान्य मिळत नाही.त्यामुळे एवढे मोठे धान्य गेले कुठे हा प्रश्न? गावातील नागरिकांना पडला आहे.गावात अनेक एकल महिला आहेत त्यांना या रेशनच्या धन्याचा खुप आधार आहे.
अशा कुटुंबाची कौटुंबिक स्थिती प्रतिकूल आहे. तेव्हा या रेशन घोटाळ्याची चौकशी होणे तितकेच गरजेचे आहे त्याशिवाय नेमका किती?घोटाळा हनुमंतगाव मध्ये झाला हे सत्य जनतेसमोर येणार नाही.तसेच या घोटाळ्यामागे नेमका कुणाचा हात आहे व एवढ्या मोठ्या प्रमाणात हडप केलेले धान्य नेमके गेले कुठे या सर्व प्रश्नांची चौकशी होणे आवश्यक आहे.
शासनाने या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करावी व त्या मार्फत चौकशी करावी.व या मध्ये जे कोणी दोषी आढळतील या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा राहता तहसील कार्यालय समोर एकलव्य सेनेच्या वतीने तीव्र निदर्शने केली जातील असा इशारा अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाची त्यांना माहिती दिली जाणार आहे व निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे असे ज्ञानेश्वर अहिरे यांनी सांगितले.
