राहुरी फॅक्टरी प्नतिनिधी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व निवासी अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने नियमित करण्याचा आमचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रसादनगर मधील पात्र शासकीय जागा आणि घरे शोधण्यासाठी आम्ही येथील जागांची आणि घरांची पाहणी सुरू केली असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी दिली.
पुढे बोलताना ढूस म्हणाले की,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील ०१ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार देवळाली प्रवरा हद्दीतील पात्र जागा आणि घरांचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रसादनगर येथून सुरुवात केली आहे.
शासन निर्णयातील अटी शर्ती आणि निकष या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पात्र शासकीय जमीन व घरांचा शोध घेऊन शासन निर्णयानुसार येथील सर्व अतिक्रमणे नियमित करण्यासाठी सक्षम असलेल्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही लवकरच प्रस्ताव सादर करणार आहोत.
त्यासाठीचा पहिला प्रयत्न हा प्रसादनगर येथून करीत असून त्यास यश आल्यानंतर देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने नियमित करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे ढूस यांनी सांगितले.तसेच देवळाली प्रवरा हद्दीतील जे नागरिक सन २०११ च्या अगोदरपासून शासकीय जागेत राहतात त्यांनी जागेचा उतारा व घराच्या रहिवासी पुराव्यासह संपर्क साधण्याचे आवाहनही आप्पासाहेब ढूस यांनी केले आहे.
