सरस्वती महिला शेतकरी गटातर्फे पिंपरी निर्मळ येथे विविध विषयावर शेतकरी कार्यशाळा

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे सरस्वती महिला शेतकरी गट आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप,कृषी विभाग,पाणी फाउंडेशन व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
राहता तालुक्यात जलसंपदा तथा पालकमंत्री अहिल्यानगर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी विभाग,पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती महिला शेतकरी गटाच्या वतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी, हुमणी अळी नियंत्रण, तसेच एकत्रित बियाणे खरेदी व त्याचे फायदे या विषयांवर मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास शेतकरी महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी हे होते.प्रमुख उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे,मंडळ कृषी अधिकारी रमेश चोपडे,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर कडू, पाणी फाउंडेशनचे मेंटर राजेश पऱ्हे, सहाय्यक कृषी अधिकारी सौ.जया निमसे, कृषी विज्ञान केंद्राच्या विस्तार विभाग प्रमुख डॉ. प्रियंका खर्डे, गृह विज्ञान विभागाच्या सौ. सज्जला लांडगे तसेच पाणी फाउंडेशनचे  वैभव गारुडकर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी यांनी सध्याच्या हवामानातील बदल, एल निनोचा प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा उल्लेख करून शेतकऱ्यांनी हवामानानुसार नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच पिकांचे संरक्षण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि हवामान आधारित शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना,बियाणे प्रक्रिया आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मंडळ कृषी अधिकारी रमेश चोपडे यांनी शेतकरी गट बांधणीचे महत्त्व, सामूहिक खरेदी-विक्रीचे फायदे, उत्पादन खर्चात होणारी बचत तसेच शासकीय योजनांचा लाभ गटाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कसा मिळविता येतो याबाबत माहिती दिली.

कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. प्रियंका खर्डे यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणीचे महत्त्व सांगितले, तर सौ. सज्जला लांडगे यांनी महिला शेतकरी सक्षमीकरण व पोषण आहार याविषयी मार्गदर्शन केले.

सरस्वती महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा श्रीमती मीना निर्मळ यांनी परिसरातील महिला शेतकऱ्यांना एकत्र आणून गटाची यशस्वी बांधणी केली असून सामूहिक शेती विकासासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली गटाने विविध उपक्रम राबवून परिसरात आदर्श निर्माण केला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.उपस्थित शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे स्वागत करून भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कृषी विभाग, पाणी फाउंडेशन व उमेद अभियान यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकरी गट बळकटीकरणास चालना मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!