घोटी पोलिसांची झपाट्याने कारवाई
वाळविहीर फाटा परिसरात खुर्ची विक्रेत्यास मारहाण करून मोटारसायकल, खुर्च्या व रोकड लुटली; पोलिसांनी तात्काळ दोन पथके तयार करून आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणला.
नाशिक दिनकर गायकवाड इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर (करोळे) फाटा परिसरात खुर्ची विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना घोटी पोलिसांनी अवघ्या ३० मिनिटांत शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी राजेश मांगिलाल बंजारा (वय ४२ वर्ष), व्यवसाय मजुरी,मूळ रा.राजस्थान व सध्या ओमबाबा रोड, घोटी,ता.इगतपुरी, जि.नाशिक यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, दि. १० जून २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे प्लास्टिकच्या खुर्च्या विक्रीसाठी घेऊन परिसरात फिरत होते. त्यावेळी वाळविहीर फाटा येथे उपस्थित असलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना "ओ खुर्सी वाले भैय्या" अशी हाक मारून जवळ बोलावले.
फिर्यादी जवळ गेल्यानंतर आरोपींनी संगनमत करून त्यांना पकडले व लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले.त्यानंतर बळजबरीने फिर्यादीच्या ताब्यातील सुमारे ८०,००० रुपये किमतीची हिरो होंडा डिलक्स मोटारसायकल, ८,८०० रुपये किमतीच्या ११ प्लास्टिक खुर्च्या तसेच ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ८९,३०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला.
सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी तात्काळ दोन स्वतंत्र पथके तयार केली. पोलीस अधीक्षक डॉ.श्री स्वामी यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळ परिसरात वेगाने शोधमोहीम राबवली.
या कारवाईत पोलीस हवालदार सागर सौदागर,दीपक सांगळे,बाळासाहेब आहेर, श्रीकांत खैरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल पोपट वाघ यांनी कसोशीने तपास करून आरोपी व मुद्देमालाचा शोध घेतला. पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या ३० मिनिटांत गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले असून ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
या गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार इंगळे (बकल नं. १८४२) यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण उदे, घोटी पोलीस ठाणे हे करीत आहे.
