मंत्री विखे पाटील यांचे शिर्डीत आवाहन
शिर्डी प्नतिनिधी अंमली पदार्थ मुक्त देश करण्यासाठी सुरू झालेल्या मोहीमेत भारतीय जनता युवा मोर्चाने सुध्दा पुढाकार घ्यावा.केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशभर यासाठी मोहीम सुरू केली आहे.राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कडक धोरण घेतले असून,,"युवा शक्ती जागर" यात्रेतून भाजयुमोने राज्य नशामुक्त करण्याचा संदेश युवकांमध्ये पोहचविण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या युवा शक्ती जागर यात्रेचे शुक्रवारी शिर्डीत आगमन झाले.यानिमित्ताने आयोजित केलेल्या युवा मोर्चाच्या मेळाव्यात मंत्री विखे पाटील यांनी युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,सरचिटणीस अशोक पवार भाजपयुमोचे उतर जिल्ह्याचे अध्यक्ष रोहीत चौधरी,नगराध्यक्षा सौ.जयश्री थोरात,उपनगराध्यक्ष अभय शेळके,भाजपाचे शहर अध्यक्ष रविंद्र गोंदकर,यांच्यासह उतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देश नक्षलमुक्त करून दाखवला.आता अंमली पदार्थ मुक्त देश करण्यासाठी त्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे.देशाच्या सामाजिक व्यवस्थेला अंमली पदार्थांचे रॅकेट उध्वस्त करीत आहेत. याविरोधातील मोहीम यशस्वी करायची असेल तर,सर्वाच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,युवकांमध्ये जावून यासाठी प्रबोधन करावे लागेल.युवा मोर्चाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न व्हावेत आशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आज देश एक परीवर्तनाच्या काळातून जात आहे.तरुणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे.त्यामुळेच देशातील युवा शक्तीला पुढे घेवून जाण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असून,देशाची युवा शक्ती म्हणजे बौध्दीक आणि उर्जासंपन्न शक्ती असल्याचे सांगून,मागील बारा वर्षात सर्वाधिक स्टार्ट अप,मेक इन इंडीया आणि डिजिटल इंडियाच्या प्रक्रीयेत युवा शक्तीला मोठे स्थान मिळाले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
आज राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योगाची गुंतवणुक येत आहे.याचा उपयोग युवकांनाच होणार आहे.अहिल्यानगर जिल्हा सुध्दा डिफेन्स उद्योगाचे मोठे केंद्र बनत आहेत.आत्मनिर्भर भारत योजनेतून सुरू असलेली उद्योगाची उभारणी ही देशातील युवाशक्तीचे बलस्थान असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय जनतेपर्यत घेवून जाण्याची मोठी जबाबदारी भाजयुमोवर आहे.सरकारचे काम समाजात सांगण्यास आपण कमी पडतो म्हणूनच काही शक्ती डोके वर काढून युवकांमध्ये वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात.पण आशा प्रवृतीना जनाधार नसतो.
भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांनी आपल्या भाषणात यात्रेमागील उद्देश विषद करताना सांगितले की,तरुणांना राष्ट्रीय विचारांच्या प्रवाहात आणताना राज्याच्या सांस्कृतिक अध्यात्मिक परंपरांची माहीती करून देण्याचा प्रयत्न आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास प्रक्रीयेची माहीती युवकांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रोहीत चौधरी यांनी केले.
