पुणे–नाशिक रेल्वेवर राजकारण नको; सर्वपक्षीय एकजुटीनेच प्रकल्पाला गती मिळेल,
मा.खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी
संगमनेर प्रतिनिधी पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मुद्द्यावर विरोधकांनी जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी.कॅमेऱ्यासमोर एक भूमिका आणि पडद्यामागे दुसरी भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करू नये,असा रोखठोक इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
पावसाळी अधिवेशना दरम्यान पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.
आमदार खताळ म्हणाले, पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प हा केवळ एका पक्षाचा किंवा एखाद्या नेत्याचा विषय नाही.
हा अहिल्यानगर, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक परिसराच्या सर्वांगीण विकासाशी निगडित महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.त्यामुळे या विषयावर आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
मी आमदार झाल्यानंतर पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरवरून पळवली गेली,असा आरोप करून विरोधक नेमके काय साध्य करू इच्छितात? अशा आरोपांमुळे प्रकल्पाला गती मिळणार नाही.असे सांगत त्यांनी रेल्वेच्या प्रश्नावर सर्वांनी एकदिलाने लढा उभारण्याचे आवाहन केले.हा विषय कोणत्याही एका पक्षाशी संबंधित नसून सर्वसामान्य जनतेच्या विकासाशी निगडित असल्याने सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मा.खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी या रेल्वे प्रकल्पासाठी मोठा पाठपुरावा केला असल्याचे सांगत,त्यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने काम करण्यास आम्ही तयार आहोत, असेही खताळ यांनी नमूद केले.
राज्य सरकारकडूनही या प्रकल्पाबाबत सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्याची विनंती करण्यात आली असून ते लवकरच रेल्वेमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही व्यक्तीवर किंवा पक्षावर विनाकारण आरोप करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन रेल्वे प्रकल्पासाठी भक्कम पाठपुरावा करणे हीच काळाची गरज असल्याचे मतही आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.
-सर्वांनी एकत्र येऊन भक्कमपणे पाठपुरावा करु
राजकीय मतभेद बाजूला ठेवून रेल्वेसाठी एकत्र या"पुणे–नाशिक रेल्वे हा जनतेच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा विषय आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे केंद्र सरकारकडे भक्कम पाठपुरावा करावा. आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकल्पाला गती मिळणार नाही; मात्र सर्वपक्षीय एकजूट झाल्यास पुणे–नाशिक रेल्वेचे स्वप्न निश्चितच साकार होईल," असा विश्वास व्यक्त करत आमदार अमोल खताळ यांनी सर्वपक्षीय एकतेचे आवाहन केले.
