आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे यांचे निधन

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शेतकरी चळवळीच्या इतिहासात ज्या काही मोजक्या नेत्यांनी आपल्या निष्ठेने आणि कर्तृत्वाने जनमानसावर अधिराज्य गाजवले,त्यामध्ये सुभाष गागरे  यांचे नाव सदैव अग्रक्रमाने घेतले जाईल.आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेतकरी आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे पाटील यांचे नुकतेच झालेले निधन ही केवळ एका संघटनेची नव्हे,तर संपूर्ण महाराष्ट्राची, मराठा समाजाची आणि बळीराजाची कधीही भरून न निघणारी हानी आहे.
महासंघाचे संस्थापक डॉ.कृषीराज टकले यांच्या विचारांशी आणि ध्येयाशी शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहिलेला हा झुंजार शिलेदार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ.कृषीराज टकले यांचा 'उजवा हात' आणि महासंघाचा 'प्राण' म्हणून त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.
सुभाष गागरे यांचे संपूर्ण आयुष्य हा एक धगधगता संघर्ष होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्याप्रमाणे शेलार मामांनी आपल्या अनुभवाचे आणि शौर्याचे योगदान दिले,हुबेहूब तीच भूमिका सुभाष गागरे यांनी मराठा चळवळीत बजावली.

याच थोर,मार्गदर्शक आणि वटवृक्षासारख्या व्यक्तिमत्त्वामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आणि समाजाने त्यांना अत्यंत आदराने 'शेलार मामा' ही पदवी दिली होती.ते केवळ पदापुरते मर्यादित नेते नव्हते,तर महासंघाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यकर्त्याला पाठीशी घालणारे,त्यांच्या सुखादुःखात धावून जाणारे हक्काचे कुटुंबप्रमुख होते.

संघटनेची ध्येयधोरणे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले होते.मराठा आरक्षणाचा विषय असो वा समाजाच्या अस्मितेची लढाई,सुभाष गागरे पाटील नेहमीच वादळासारखे आक्रमकपणे पुढे राहिले.

समाजातील तरुण पिढीला, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे आणि कायदेशीर संघर्षाचे नेतृत्व केले. "मराठा आरक्षणासाठी सदैव झुंजत राहणारे नेतृत्व" अशी त्यांची ख्याती केवळ बोलण्यात नव्हती, तर त्यांनी ती कृतीतून सिद्ध केली होती.

आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि विखुरलेल्या मराठा समाजाला एका छताखाली आणण्यासाठी त्यांनी आपल्या आरोग्याची, कुटुंबाची आणि वेळेची कोणतीही पर्वा न करता देशभर दौरे केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशातील विविध राज्यांमध्ये जाऊन त्यांनी मराठा जनजागृतीची मोठी लाट निर्माण केली.

त्यांच्या या देशव्यापी दौऱ्यांमुळे हजारो तरुणांना स्वाभिमानाची नवी दिशा मिळाली आणि ते मुख्य प्रवाहात सामील झाले.शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे बळीराजाच्या वेदनांची त्यांना तीव्र जाणीव होती. महासंघाच्या शेतकरी आघाडीची धुरा सांभाळताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. दुष्काळ, अवकाळी पाऊस,आणि अस्मानी-सुलतानी संकटांमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हक्काचा हमीभाव मिळावा, कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांनी थेट शासनाच्या आणि प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध एल्गार पुकारला.

बळीराजाचा हक्काचा कैवारी म्हणून त्यांनी बांधावर जाऊन काम केले आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे पवित्र कार्य केले.
आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात आणि डॉ.कृषीराज टकले पाटील यांचे विचार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात त्यांचे योगदान अतुलनीय होते. 

डॉ.टकले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रत्येक संकटसमयी संघटनेची ढाल बनून काम केले. त्यांच्या जाण्याने डॉ. कृषीराज टकले यांनी आपला सर्वात निष्ठावंत आणि खंदा साथीदार गमावला आहे,तर कार्यकर्त्यांनी आपला हक्काचा पाठीराखा गमावला आहे.

सुभाष गागरे यांचे विचार, त्यांचा स्वाभिमानी बाणा, समाजाप्रती असलेली अतूट निष्ठा आणि त्यांनी उभे केलेले हे अथांग कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.या अत्यंत कठीण आणि दुःखद प्रसंगी ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि डॉ. कृषीराज टकले यांच्यासह संपूर्ण गागरे पाटील परिवार, नातेवाईक,आप्तेष्ट आणि आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या लाखो कार्यकर्त्यांना या डोंगराएवढ्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!