शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा धगधगता प्रश्न उभा
लोणी:नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली की सर्वत्र उत्साह पाहायला मिळतो.नवागताचे शाळेत पडणारे पहिले पाऊल हे प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण असतो आणि या क्षणाचा आनंद घेण्यासाठी सर्वच पालकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतो.
आपल्या लाडक्या मुलांचे कौतुक करण्यासाठी, त्यांना शाळेच्या वातावरणात रुजवण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी संपूर्ण कुटुंब सरसावलेले असते. शाळेत येणाऱ्या लहानग्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा प्रशासन आणि जुने विद्यार्थी सज्ज असतात.
कोणी फुगे देऊन,कोणी चॉकलेट देऊन तर कोणी प्रेमाने पाठीवर हात फिरवून या नव्या पाहुण्यांचे स्वागत करतात.अशा वेळी पालकांचा ऊर अभिमानाने भरून येतो. आपल्या पाल्याने शिक्षणाच्या जगात दिलेले हे पहिले पाऊल त्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल, असा विश्वास त्यांच्या मनात असतो.
शाळेच्या पहिल्या दिवशी कितीतरी बाल गोपाळांना वेगवेगळ्या पद्धतीने सजवून,नवीन कपडे आणि नवीन दप्तर देऊन शाळेत आणले जाते.काही मुले उत्साहाने बागडत असतात,तर काही आई-वडिलांचा हात सोडून वर्गात जाण्यास रडत असतात. मग काय कौतुकाने आज कोणाचे आजी-आजोबा, तर कोणाचे आई-वडील आपल्या मुलांना शाळेत सोडवण्यासाठी आणि त्यांचा धीर वाढवण्यासाठी आलेले असतात.
शाळेच्या या प्रांगणात मुलांच्या भविष्याचे पहिले धडे गिरवले जातात.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी जडणघडण याच चार भिंतींच्या आत आणि मैदानावर होत असते. येथेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांची मूल्ये विकसित केली जातात.
ही झाली आपल्या समाजातील एक बाजू, जी अत्यंत सुखावह, आनंददायी आणि प्रत्येकाला सुजाण नागरिकतेची जाणीव करून देणारी असते.परंतु,ही झाली समाजात आकलेली किंवा सर्वांना सहज दिसणारी एक बाजू, पण या नाण्याची दुसरी बाजू काय आणि कशी आहे,याचा विचार आपण कधी गांभीर्याने करतो का? या नाण्याची दुसरी बाजू अत्यंत भीषण, दाहक आणि डोळ्यात अंजन घालणारी आहे.दुसरी बाजू म्हणजेच समाजातील शाळाबाह्य असणारी छोटी मुले.
यामध्ये प्रामुख्याने ऊसतोडणी कामगारांची मुले, वीटभट्टीवर काम करणाऱ्यांची मुले, भटक्या विमुक्तांची मुले आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात किंवा गावात इकडे-तिकडे फिरणाऱ्या गरिबांची मुले समाविष्ट आहेत.
ज्या वयात या मुलांच्या हातात पाटी आणि पेन्सिल असायला हवी, त्या वयात त्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे असते. त्यांच्यासाठी शाळाबाह्य असणे ही हौस नसते, तर ती एका अत्यंत विदारक परिस्थितीची अपरिहार्यता असते.
या गरीब आणि वंचित मुलांच्या बाबतीत शाळेचा प्रश्न कोणता आहे आणि तो कसा सोडवावा, या प्राथमिक बाबींबद्दल त्यांचे आई-वडील स्वतः सुशिक्षित नसल्यामुळे किंवा परिस्थितीने गांजलेले असल्यामुळे पूर्णपणे अज्ञानी असतात.
दिवसभर उन्हातानात मोलमजुरी करून, वीटभट्टीवर घाम गाळून किंवा उसाच्या फडात कष्ट करून राहणारे कुठे दोन वेळच्या जेवणाची सोय होईल आणि राहण्यासाठी तात्पुरता निवारा मिळेल,याच विवंचनेत हे पालकवर्ग अहोरात्र जगत असतात.
अशा अत्यंत कठीण परिस्थितीत जगणाऱ्या या पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी कुठे वेळ? हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे नाईलाजाने ही लहान मुले आपल्या आई-वडिलांच्या मागेमागे फिरत असतात,त्यांच्या कामात छोटी-मोठी मदत करतात किंवा लहान वयातच स्वतः श्रम करू लागतात.परिणामी, समाजात हा मोठा बालवर्ग शिक्षणासारख्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण हक्कापासून पूर्णपणे वंचित राहिलेला दिसून येतो.
या अनाथ,वंचित आणि शाळाबाह्य मुलांच्या बाबतीत त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी जोडलेला आहे.म्हणूनच, समाजातील सुजाण आणि सुशिक्षित घटकांनी पुढे येऊन हा प्रश्न संवेदनशीलतेने सोडवला पाहिजे. कारण आजची ही लहान मुले म्हणजेच देशाचे उद्याचे भविष्य आहेत.
जर देशाचे भविष्यच शिक्षणाच्या उजेडापासून दूर अंधारात राहिले, तर एका सशक्त राष्ट्राची निर्मिती कशी होणार? आज बालमजुरीची संख्या कागदावर जरी कमी झालेली दिसत असली,तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत.या प्रश्नांचे उत्तर केवळ योजनांवर अवलंबून न राहता,आपण सर्वांनी मिळून शोधणे गरजेचे आहे.
सर्वच मुलांचे बालपण हे सारखे नसते, काहींना ते सुखात घालवायला मिळते तर काहींना परिस्थितीनुसार ते स्वीकारावे लागते आणि बालवयातच मोठे व्हावे लागते. हे सामाजिक वास्तव बदलण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न करावेच लागतील.तरच शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटक माणूस म्हणून मुख्य प्रवाहात येतील
